मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रमासाठी पोलीस संरक्षण देण्याची तयारी दाखवूनही शिवसेनेच्या विरोधामुळे ज्येष्ठ गझल गायक गुलाम अली यांचा ९ ऑक्टोबर रोजी मुंबईत होणारा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. पाकिस्तानशी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवण्यास किंवा तेथील खेळाडू व कलावंत यांना मुंबईत किंवा राज्यात पाय ठेवू देणार नाही, अशी शिवसेनेची भूमिका आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोध मागे घेण्यास नकार दिल्याने अखेर आयोजकांनी हा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला.
पाकिस्तानच्या भूमीवरून दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन दिले जाते, भारतीय सैनिकांच्या हत्या केल्या जातात आणि सीमेवर गोळीबारही होतो. त्यामुळे पाकिस्तानशी खेळ किंवा सांस्कृतिक संबंधही ठेवले जाऊ नयेत, अशी शिवसेनेची गेल्या अनेक वर्षांपासूनची भूमिका आहे. पाकिस्तानी संघाबरोबर होणारा क्रिकेट सामना रोखण्यासाठी वानखेडे मैदानातील खेळपट्टीही उखडण्यात आली होती. पाकिस्तानी कलावंतांचा कार्यक्रम आयोजित करणे किंवा पाकिस्तानी खेळाडूंचा समावेश असलेले सामने आयोजित करणे, मुंबईत तरी शक्य झाले नव्हते.
‘पनाश मीडिया’तर्फे ९ ऑक्टोबर रोजी षण्मुखानंद सभागृहात गुलाम अली यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पण त्यास शिवसेनेचा विरोध असून तरीही तो आयोजित करण्याचा प्रयत्न झाल्यास शिवसेनेच्या पद्धतीने तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा चित्रपट सेनेचे सरचिटणीस अक्षय बर्दापूरकर यांनी दिला.
षण्मुखानंद सभागृहाच्या व्यवस्थापकांना त्यांनी निवेदनही दिले. त्यानंतर आयोजकांना पोलीस संरक्षण देण्याची तयारीही मुख्यमंत्र्यांनी दर्शविली. पण धाबे दणाणलेल्या आयोजकांनी ठाकरे यांची महापौर बंगल्यात भेट घेतली. शिवसेना भूमिका बदलणार नाही आणि विरोध कायम आहे, असे त्यांनी स्पष्ट केल्याने आयोजकांनी कार्यक्रम रद्द केला, असे सूत्रांनी सांगितले.