पानसरे हत्याप्रकरण; सरकारची न्यायालयात माहिती

अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला सनातन संस्थेचा साधक वीरेंद्र तावडे याच्यावर कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी पुढील महिन्यात आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. राज्य सरकारतर्फे त्याची माहिती गुरुवारी उच्च न्यायालयात देण्यात आली.

तावडेला पानसरे हत्येप्रकरणीही अटक करण्यात आली आहे. तर पानसरे हत्येप्रकरणी समीर गायकवाड याला आधीच अटक करण्यात आली आहे. परंतु त्याच्यावर चालवण्यात येणाऱ्या खटल्याला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. दाभोलकर, पानसरे आणि विचारवंत एम. एम. कलबुर्गी या तिघांच्या हत्येप्रकरणी समान दुवा आहे की नाही, असल्यास ते सिद्ध करण्यासाठी या तिघांच्या शरीरातून सापडलेल्या गोळ्या चाचणीसाठी स्कॉटलंड यार्डकडे पाठवण्यात येणार आहेत. त्याचाच दाखला देत राज्य सरकारने खटल्याला स्थगिती देण्याची मागणी केली होती. ती न्यायालयाने मान्य करत खटल्याला स्थगिती दिली होती.

न्यायमूर्ती रेवती ढेरे यांच्यासमोर या प्रकरणी गुरुवारी सुनावणी झाली. त्या वेळेस पानसरे हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तावडेवर पुढील महिन्यात आरोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सरकारी वकील संदीप शिंदे यांनी न्यायालयाला दिली. तसेच गोळ्यांचा न्याय्यवैद्यक अहवाल आलेला नाही. त्यामुळे मुद्देमालाशिवाय खटल्याची सुनावणी सुरू करता येऊ शकत नाही, असेही त्यांनी न्यायालयाला सांगितले. त्यानंतर न्यायालयाने प्रकरणाची सुनावणी २ डिसेंबर रोजी ठेवली व तोपर्यंत खटल्याला दिलेली स्थगिती कायम राहील, असेही स्पष्ट केले.