नगरविकास राज्यमंत्र्याचे संकेत; रस्ते कामांत १४ कोटींचे नुकसान

मुंबई महानगरपालिकेकडून झालेल्या रस्त्यांच्या कामात शंभर टक्के अनियमितता झाली असून आतापर्यंतच्या चौकशीत पाच रस्त्यांच्या कामात १४ कोटींचे नुकसान झाले आहेत. आणखी २०० रस्त्यांच्या कामाची चौकशी सुरू आहे. या घोटाळ्याचा तपास योग्य रीतीने सुरु आहे. मात्र त्याची व्याप्ती पाहता गरज पडल्यास भारताचे नियंत्रक व महालेखापरिक्षक (कॅग) तसेच केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) मार्फत चौकशी करण्यात येईल, अशी ग्वाही नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी गुरूवारी विधान परिषदेत दिली.

कॉंग्रेसचे नारायण राणे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, संजय दत्त, प्रविण दरेकर आदी सदस्यांनी मुंबई महापालिकेत सध्या गाजत असलेल्या रस्ते घोटाळ्याबाबत उपस्थित केलेल्या लक्षवेधीवरील चर्चेदरम्यान पाटील यांनी ही ग्वाही दिली. कंत्राटदार, उच्पदस्थ अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या संगनमताने गेल्या तीन वर्षांत तब्बल नऊ हजार कोटींचा रस्ते घोटाळा झाला असून यावर्षी ३५२ कोटी रूपयांच्या कस्ते कामातील गैरव्यवहार फक्त १४ कोटींचा दाखविण्यात आला आहे. तसेच ज्यांना ही कंत्राटे मिळाली आहेत, त्या कंपन्यांमध्ये स्थायी समितीचे माजी अध्यक्षही भागीदार असल्याचा आरोप करीत राणे यांनी या संपूर्ण घोटाळ्याची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी केली. तसेच ही कामे घेणाऱ्या कंपन्यांमध्ये कोणाकोणाची भागीदारी त्यांची नावे जाहीर करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.

महापालिकेच्या पाच कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या पाच रस्त्यांची चौकशी पूर्ण झाली आहे, तर अजून २०० रस्त्यांची चौकशी बाकी आहे. ही चौकशी पारदर्शक आणि निपक्षपणे पूर्ण होईल आणि अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल, असे राज्यमंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले. या घोटाळ्याबाबत आयुक्तांनी दिलेल्या अहवालात ५३ टक्के अनियमितता झाल्याचा ठपका ठेवण्यात आला असला तरी अहवालाची सखोल तपासणी करता त्यात १०० टक्के अनियमितता असल्याचे आढळून आल्याचेही पाटील यांनी सांगितले.

त्याचप्रमाणे यासंदर्भातला कृती अहवाल महानरपालिकेने सगळ्यांसाठी खुला करावा असे आदेश देण्यात येतील असेही त्यांनी सांगितले. मात्र महानगरपालिकेच्या सगळ्या कामात होत असलेल्या भ्रष्टाचाराची आयोग नेमून चौकशी करावी आणि महानगरपालिका बर्खास्त करावी ही विरोधकांची मागणी सरकारने फेटाळून लावली.