सलग दुसऱ्या वर्षी ‘केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा’च्या (सीबीएसई) दहावीच्या निकालाने घसरण दर्शविली असली तरी निकालाचा गुणात्मक दर्जा यंदा आश्चर्यकारकरित्या वाढला आहे. कारण, यंदा ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गेल्या वर्षीच्या सुमारे ९४ हजारावरून १.६८ लाखावर गेली आहे. त्यामुळे, केवळ मुंबईतच नव्हे तर देशभरात अकरावी प्रवेशाकरिता इतर शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांना सीबीएसईच्या विद्यार्थ्यांशी चांगलीच झुंज द्यावी लागणार आहे.
यंदा उत्तीर्ण झालेल्या १४,३१,८६१ विद्यार्थ्यांपैकी तब्बल १,६८,५४१ विद्यार्थ्यांनी सर्वाधिक १० सीजीपीएची (क्युमिलेटीव्ह ग्रेड पॉईंट अ‍ॅव्हरेज) कमाई केली आहे. १० सीजीपीए म्हणजे ९० टक्के किंवा त्याहून अधिक गुण. थोडक्यात देशभरातील १.६८ लाख विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुणांची कमाई केली आहे. गेल्या वर्षी हाच आकडा ९४,४७४ इतका होता. त्या खालोखाल ९.८ आणि ९.६ सीजीपीए मिळविणारी अनुक्रमे ५०,८५८ आणि ५२,७४५ इतके विद्यार्थी आहेत. (१० ते ४.० या दरम्यान ३१ वेगवेगळ्या टप्प्यांवर सीजीपीए दिला जातो) निकालाचा गुणात्मक दर्जा इतका वाढल्याने साहजिकच यंदा अकरावी प्रवेशाकरिता इतर त्यातही राज्याच्या शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांची सीबीएसईच्या विद्यार्थ्यांशी कडवी झुंज असेल. गेल्या वर्षीच्या तुलनेत सीबीएसईच्या परीक्षार्थीचे प्रमाण ८.५ टक्क्यांनी यंदा वाढले होते. त्यामुळे यंदा ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले असावे, असा अंदाज व्यक्त होतो आहे. तर सातत्यपूर्ण आणि र्सवकष मूल्यमापन प्रणाली शाळांच्या आणि विद्यार्थ्यांच्या अंगवळणी पडू लागल्यानेही निकाल गुणात्मकदृष्टय़ा वाढला असावा, अशी शक्यता ज्ञानप्रबोधिनी प्रशालेचे मििलद नाईक यांनी व्यक्त केली.
दरम्यान, सीबीएसईच्या दहावीच्या निकालाने यंदा एकूण ९६.२१ इतकी टक्केवारी नोंदविली आहे. गेल्या वर्षी हाच निकाल ९७.३२ टक्के इतका होता. एकूण निकालात घसरण असतानाही मुलींनी मात्र सालाबादप्रमाणे निकालात सरशी घेतली आहे. तर महाराष्ट्रातून ४३,४७१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ४३,३३० इतके विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेचे हे प्रमाण ९९.६८ टक्के इतके आहे.
मार्च, २०१६मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सीबीएसईने शनिवारी ऑनलाइन जाहीर केला. २०१४ मध्ये ९८.८७ टक्क्यांवर असलेल्या या निकालात यंदा आणखी घसरण झाली आहे. देशभरातून १४,९१,२९३ इतके विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. यात ८,८६,७४१ मुलगे आणि ६,०२,२८० मुलींचा समावेश होता.
दहावीच्या परीक्षेचे विद्यार्थ्यांवर दडपण येऊ नये म्हणून सीबीएसई विद्यार्थ्यांकरिता मंडळ स्तरावर परीक्षा घेण्याबरोबरच विद्यार्थ्यांना शालेय स्तरावरही परीक्षा देण्याचा पर्याय देते. त्यानुसार शाळा स्तरावर परीक्षा दिलेले ६,९०,१९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. महाराष्ट्रातून अवघ्या २,५९९ इतक्या विद्यार्थ्यांनी शाळा स्तरावर परीक्षा दिली होती. त्यापैकी १,५८७ इतके विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर दरवर्षीप्रमाणे यंदाही केंद्रीय (९८.८५टक्के) व नवोदय (९८.८७ टक्के) विद्यालयांनी सर्वाधिक उत्तीर्णतेचे प्रमाण नोंदविले आहे. तर सर्वात कमी निकाल सरकारी (८६.६१टक्के) आणि अनुदानित (८५.६२टक्के) शाळांनी नोंदविला.