भाजप खासदाराला वाचविण्यासाठी पोलिसांचा पवित्रा?

देशभरातील गणेशभक्तांचे श्रद्धेचे स्थान असलेल्या सिद्धिविनायक मंदिराचा गाभारा व परिसराचे थेट चित्रीकरण खासगी दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून आणि खासगी व्यक्तींकडूनही होत असते. पण मध्य प्रदेशमधील भाजप खासदार गणेश सिंग यांनी १ जानेवारीच्या पहाटे घातलेल्या गोंधळाचा तपशील मिळविण्यासाठी माहिती अधिकारामध्ये सीसीटीव्ही फूटेज मागितल्यावर मात्र मंदिराच्या सुरक्षेसाठी ते गोपनीय असल्याचा पवित्रा पोलीस खात्याने घेतला आहे. तर अखेरीस ते नष्टच झाल्याचा दावा करण्यात आल्याने खासदाराला वाचविण्यासाठी सरकारच्या आदेशानुसार उच्चपदस्थांची ही धडपड असल्याचे समजते.

खासदार गणेश सिंग हे नववर्षांच्या पहाटे गणेशदर्शनासाठी आले असताना मंदिर बंद असल्याने त्यांची बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांबरोबर बाचाबाची झाली. त्यांनी मंदिर उघडण्यासाठी दबाव आणल्याचाही आरोप झाला होता आणि काँग्रेसने याविरोधात आवाज उठविला होता. त्यानंतर प्रवक्ते सचिन सावंत यांनी सिद्धिविनायक मंदिर व पोलिसांकडे हा प्रकार घडला त्यावेळीचे सीसीटीव्ही फूटेज माहिती अधिकारामध्ये मागितले. मात्र सिद्धिविनायक मंदिर हे अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असून सुरक्षेच्या कारणासाठी ते देता येणार नाही, असा पवित्रा पोलिसांनी घेतला.

त्यामुळे सावंत यांनी राज्य माहिती आयुक्त अजित कुमार जैन यांच्याकडे अपील दाखल केले होते. तेव्हा अंतिम टप्प्यात हे सीसीटीव्ही फूटेज नष्टच झाल्याचा दावा पोलीस व मंदिर व्यवस्थापनाकडून करण्यात आला. हे फूटेज २६ दिवस ठेवले जाते, असे कारण देण्यात आले. १ जानेवारीच्या घटनेनंतर सावंत यांनी २१ जानेवारीला अर्ज केला होता आणि नंतरही हे फूटेज सुरक्षित ठेवण्याची मागणी केली होती. पण गेल्या नऊ महिन्यात हे फूटेज नष्ट केल्याचे न सांगता अर्ज अंतिम टप्प्यात असताना ही सबब देण्यात आली.

सिद्धिविनायकाचा गाभारा व परिसरातील चित्रीकरण वाहिन्यांवर व यू-टय़ूबवर उपलब्ध आहे. हा प्रसंग मंदिराबाहेर घडला होता. रस्त्यावरून कोणालाही चित्रीकरण करता येते. त्यामुळे भाजप खासदाराला वाचविण्यासाठी ही धडपड केली गेल्याचा आरोप सावंत यांनी केला.