शहरातल्या प्रत्येक महत्त्वाच्या चौकांवर, महत्त्वाच्या मार्गावरील सिग्नलवर सुमारे हजारेक सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. येत्या काळात त्यात निश्चित भर पडणार आहे. या सर्व सीसीटीव्हींनी कैद केलेले लाइव्ह चित्रण वाहतूक पोलिसांच्या वरळी येथील नियंत्रण कक्षात न्याहाळले जाते. त्यासाठी स्वतंत्र मनुष्यबळ जोडून देण्यात आले आहे. या नियंत्रण कक्षातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे २४ तास, सतत सीसीटीव्ही चित्रणावर करडी नजर रोखून असतात. कोणत्या रस्त्यावर वाहतूक तुंबली, कुठे अपघात घडला ही माहिती क्षणात नियंत्रण कक्षाला मिळते आणि जवळच्या चौकीतील मनुष्यबळ तेथे रवाना करून वाहतुकीचे नियमन केले जाते. यासोबतच कोणत्या वाहनाने सिग्नल मोडला, कोणामुळे अपघात घडला इथपासून कोणते वाहन मर्यादेपेक्षा जास्त वेगाने धावत होते, याचीही नेमकी माहिती नियंत्रण कक्षात बसलेल्यांना मिळते. सीसीटीव्हीत वाहनाचा नंबर मिळतो. त्याआधारे वाहनचालकाच्या घरी चलान धाडले जाते. त्यामुळे सिग्नल पल्ल्याड वाहतूक पोलीस नसल्याची संधी साधून नियम मोडण्याचे साहस न केलेलेच बरे.

वाहतूक पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार शहरात मोक्याच्या ठिकाणी राज्य शासनाकडून बसविण्यात आलेल्या सुमारे पाच हजार सीसीटीव्हींचे चित्रणही वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षातून पाहिले जाऊ शकते. अनेकदा त्या चित्रणाची मदत घेऊनही वाहुकीचे नियमन, कारवाई केली जाते. आतापर्यंत सीसीटीव्हीच्या मदतीने हजारो वाहनचालकांकडून दंड वसूल करण्यता आला आहे.

मुंबईत रस्त्यांची लांबी आणि वाहने यांचे व्यस्त प्रमाण आहे. शहरात येणाऱ्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. त्या तुलनेत रस्त्यांची लांबी वाढत नाही. त्यामुळे वाहतूक तुंबणे, पार्किंग या दोन महत्त्वाच्या समस्या मुंबईकरांना भेडसावतात. वाहनांच्या संख्येच्या तुलनेत वाहतूक पोलिसांचे मनुष्यबळ अपुरे आहे. अशा परिस्थितीत वाहतूक पोलिसांना सीसीटीव्हींची महत्त्वाची मदत होते आहे. सीसीटीव्हींमुळे प्रत्येक रस्त्यावर, प्रत्येक चौकात वाहतूक पोलीस नेमण्याची आवश्यकता आता राहिलेली नाही. त्याचा परिणाम ज्या रस्त्यावर वाहतूक तुंबली तिथे पोलीस चटकन पोहोचून उपाययोजना करू शकतात.

सरकारी यंत्रणेत कितीही आधुनिकता आली तरी मूळची उदासीनता या आधुनिकतेलाही मागे टाकले. त्यामुळे सीसीटीव्ही बसवण्यात आले असले तरी, ते सुरूच राहतील, याची खबरदारी कोणतीही यंत्रणा घेत नाही. अनेकदा सीसीटीव्ही बंद पडतात. ती माहिती मिळताच डागडुजी करून ते लगेच सुरू करून घेणे ही जबाबदारी वाहतूक पोलिसांची आहे. प्राधान्याने वाहतूक पोलिसांनी सर्वच सीसीटीव्ही कायम सुरू राहतील याची काळजी घेणे आवश्यक आहे. मध्यंतरी एक नायजेरिअन अमली पदार्थ तस्कर पोलिसांच्या कोठडीतून पळाला. दक्षिण मुंबईतून तो टॅक्सी बदलत बदलत पूर्व मुंबईत आला. तिथून तो रिक्षाने पुढे नवी मुंबईत पोहोचला. पूर्व मुंबईत जिथे त्याने रिक्षा पकडली तो त्या भागातला महत्वाचा, मोक्याचा चौक होता. पोलिसांनी वाहतूक पोलिसांकडे त्याचे चित्रण मागितले. त्या चौकातला व त्यापुढील सिग्नलवरील अनेक सीसीटीव्ही बंद आहेत. त्यामुळे चित्रण मिळू शकत नाही, असे उत्तर वाहतूक पोलिसांकडून मिळाले. पुढे पोलिसांनी या नायजेरिअन तरुणाला अटक केली. पण जर वाहतूक पोलिसांचे सीसीटीव्ही सुरू असते तर ही कारवाई खूप आधीच घडली असती.

वाहतूक पोलिसांशिवाय गंभीर गुन्हय़ांची उकल करणाऱ्या स्थानिक पोलिसांना, गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनाही या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मोलाची मदत होते. गुन्हा करून आरोपी किंवा त्यांचे वाहन कोणत्या दिशेला गेले, कुठे थांबले याची माहिती पोलिसांना मिळते. हत्या घडली, दरोडा पडला की पोलीस सर्वप्रथम त्या इमारतीतले, आसपासचे सीसीटीव्ही चित्रण मिळवून त्याचा अभ्यास करण्याच्या धडपडीत असतात. त्याआधारे आजवर अनेक गुन्हय़ांची उकल पोलिसांनी केलेली आहे. रहिवासी संकुल, इमारती, रस्त्यावरील दुकाने या सर्वाना पोलिसांकडून वेळोवेळी सीसीटीव्ही बसवून घेण्याचे आवाहन केले आहे. दादर-झवेरी बाजार येथे बॉम्बस्फोट घडविणारे इंडियन मुजाहिदीनचे अतिरेकी या कारवाईआधी दक्षिण मुंबईत वास्तव्यास होते. त्यातील एक आरोपी दगडी चाळीतील व्यायामशाळेत दररोज व्यायामासाठी येत होता, ही महत्त्वाची माहिती दहशतवादविरोधी पथकाला खासगी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी दिली. आझाद मैदान दंगल बाहेरून आलेल्या घोळक्याने भडकवली, हा अंदाज छत्रपती शिवाजी टर्मिनन्स येथील सबवेमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे पोलिसांना लावता आला. या परिसरातील सीसीटीव्हींचे चित्रण पाहून पोलिसांनी अनेक आरोपींना अटक केली. त्यांचा दंगलीतील सहभाग पोलिसांना स्पष्ट करता आला. आंबेडकर भवन वादानंतर माटुंगा, दादर येथे दंगल उसळली. तेव्हा पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्त यांच्या कार्यालयात शहरातील सर्व सीसीटीव्हींचे चित्रण लाइव्ह दिसेल अशी व्यवस्था करण्यात आली होती.

जयेश शिरसाट

jayesh.shirsat@expressindia.com