राज्यातील सर्व घटकांना सोबत घेऊन राज्याचा सर्वागीण विकास घडविण्यास राज्य सरकार कटिबद्ध आहे. येत्या काळात महाराष्ट्र हे केवळ देशातीलच नव्हे तर जगातील सर्वोत्कृष्ट राज्य बनविण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी राज्यातील जनतेला दिली. मुंबईकराच्या सुरक्षिततेसाठी ऑक्टोबर, २०१६ पर्यंत ६००० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे निर्माण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
स्वातंत्र्यदिनानिमित्त शनिवारी मंत्रालयात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रध्वजारोहण समारंभ झाला. यावेळी फडणवीस यांनी आपल्या सरकारच्या कामाचा आढावा घेतानाच पुढील वाटचालीची दिशाही स्पष्ट केली. गेल्या काही वर्षांत आलेल्या विविध नसíगक आपत्तींमुळे शेतकरी संकटात आहे. त्याला सावरण्यासाठी मराठवाडय़ातील सहा आणि विदर्भातील आठ अशा १४ जिल्ह्य़ांमधील सुमारे ६० लाख शेतकऱ्यांसाठी अन्न सुरक्षा योजना सुरू करीत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ३ रुपये किलो दराने तांदूळ तर २ रुपये किलो दराने गहू उपलब्ध करून दिला जाणार आहे. राज्यातील नागरिकांच्या विशेषत महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पुण्यापाठोपाठ मुंबईतही ऑक्टोबर २०१६ पर्यंत साधारण ६००० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.