तिथीनुसारच शिवजयंती साजरी करण्यात यावी, अशी मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी गुरुवारी मुंबईत सांगितले. राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेतर्फे गुरुवारी महापौर बंगल्यावर शिवजयंतीचा शासकीय कार्यक्रम पार पडला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी शिवजयंती तिथीनुसार साजरी करण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले.
शिवसेना दरवर्षी तिथीनुसारच शिवजयंती साजरी करते. मात्र, यंदा शिवसेना राज्यामध्ये सत्तेत सहभागी असल्यामुळे शासनाच्या निर्णयाप्रमाणे शिवसेनेचे मंत्री तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी करीत आहेत. शिवसेना पक्ष तिथीनुसारच शिवजयंती साजरी करणार असल्याचे प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बुधवारी सांगितले. सरकार तारखेनुसार शिवजयंती साजरी करीत असताना सेनेकडून तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाते, आता शिवसेना सरकारमध्ये सामील असल्याने त्यांची पंचाईत झाली आहे.