न्यायालयाच्या निर्णयाचा मराठी चित्रपट कलाकारांनाही फटका

दहीहंडीच्या कार्यक्रमात काही मिनिटांसाठी हजेरी लावण्याकरता हजारांपासून लाखांपर्यंत रक्कम घेणाऱ्या मराठी-हिंदी चित्रपट कलाकारांची गर्दी यावेळी कुठेच दिसली नाही. यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अनेक दहीहंडीच्या आयोजकांनी माघार घेतल्याने त्याचा फटका कलाकारांना बसला. या कार्यक्रमासाठी त्यांना सुपारी मिळाली नाही. यावेळी काही मराठी कलाकारांनी मुंबईऐवजी पुण्यात दहीहंडीच्या कार्यक्रमांना हजेरी लावली. ‘सैराट’ फेम जोडी रिंकु राजगुरू आणि आकाश ठोसर यांचा यावर्षी दहीहंडी कार्यक्रमांमध्ये बोलबाला असेल, असा अंदाज होता. मात्र त्यांच्याबरोबरच अन्य प्रसिद्ध मराठी कलाकारांचाही दहीहंडीसाठी फारसा उत्साह दिसला नाही.

वरळीतील जांबोरी मैदानची दहीहंडी, घाटकोपर, ठाणे आणि दादरची ‘आयडियल’ची दहीहंडी इथे दरवर्षी मराठी-हिंदी कलाकार मोठय़ा प्रमाणावर हजेरी लावतात. आपल्या चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी अनेक बॉलीवूड कलाकार दहीहंडी कार्यक्रमांचा व्यासपीठ म्हणून वापर करतात. यावेळी टायगर श्रॉफ आणि जॅकलिन फर्नाडिझ जोडीचा ‘फ्लाईंग जाट’ हा एकमेव हिंदी चित्रपट या आठवडय़ात प्रदर्शित होत आहे. त्यामुळे हे दोघे काही ठिकाणी हजेरी लावतील, ही शक्यता होती. मराठीमध्ये दहीहंडीचाच विषय हाताळणारा अवधूत गुप्ते दिग्दर्शित ‘कान्हा’ हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे. त्यामुळे या चित्रपटातील कलाकार वैभव तत्ववादी, गश्मीर महाजनी, गौरी नलावडे, प्रसाद ओक आणि दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांनी दहीहंडीच्या कार्यक्रमांना हजेरी लावली. ठाण्यातील टेंभीनाका येथील दहीहंडी, वरळीतील जांबोरीची दहीहंडी याशिवाय कांदिवली, चर्नीरोड येथील दहीहंडीला त्यांनी हजेरी लावली. ठाण्यात दिग्दर्शक विजू माने आणि ‘चला हवा येऊ द्या’ फे म कुशल बद्रिके, भाऊ कदम यांनी हजेरी लावली. हिंदीत तर रणबीर कपूर वगळता एकही मोठा चेहरा दहीहंडी कार्यक्रमांमध्ये दिसला नाही. ‘मुंबई सिटी फुटबॉल क्लब’ने शिवसेनेच्या युवा सेनेबरोबर अंधेरी स्पोर्ट्स क्लबमध्ये दहीहंडीचे आयोजन केले होते. रणबीर कपूर या क्लबचा मालक असल्याने तो या दहीहंडीसाठी उपस्थित होता. सेलिब्रिटीची दहीहंडी म्हणून प्रसिद्ध असलेल्या आयडियलच्या दहीहंडीतही कलाकार नव्हते. यावेळी मुंबईत दहीहंडीचे फारसे उत्साही वातावरण नसल्याने अनेक मराठी कलाकारांनी आपला मोर्चा पुण्यात वळवला होता.

रिंकु राजगुरू हे पुण्यातील दहीहंडीचे आकर्षण होती. भोसरी आणि वारजे येथील दहीहंडी कार्यक्रमाला ती उपस्थित होती. तर सध्या हिंदीचा रुपेरी पडदा गाजवणाऱ्या राधिका आपटेसह सुरूची आडारकर, सुरभी हांडे, प्रिया मराठे, राधिका देशपांडे, शर्वरी जमेनीस पुण्यातील दहीहंडी कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्या होत्या. मात्र यावेळी दहीहंडीला कलाकारांची वर्दळ फारच कमी होती.