मुंबईवर मंगळवारी कोसळलेल्या वीज संकटाला केंद्र सरकार जबाबदार आहे असे मी म्हटलेले नसून विजेसारख्या प्रश्नावर केंद्राने नेतृत्व स्वीकारण्याची भूमिका घेणे आवश्यक आहे असे म्हटले आहे, असा खुलासा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी वाशी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. मुंबईवरील वीज संकट हा राज्याच्या नियोजनाचा अभाव असल्याची टीका केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हा खुलासा केला़
विजेच्या प्रश्नावर इंडोनेशियासारख्या देशांबरोबर राज्य सरकार चर्चा करू शकणार नाही. त्यासाठी केंद्रालाच पुढाकार घ्यायला हवा. मुंबईमधील वीज संकट हे आर्थिक संकट आणणारे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
सिडकोच्या वतीने २६० कोटी रुपये खर्च करून वाशी येथे बांधण्यात आलेल्या देशातील पाचव्या प्रदर्शन केंद्राचे उद्घाटन व नेरुळ येथील पत्रकार भवनाचे भूमीपूजन मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते झाले. मुंबईवर आलेले वीज संकट हा केवळ राज्याचा प्रश्न नसून शेजारच्या पाच राज्यांना देखील वीज संकट सतावणार आहे. अशा वेळी केंद्र सरकाराने नेतृत्वाची भूमिका घेण्याची गरज आहे. खासगी उत्पादकांना कोळसा मिळत नसल्याने ते वीजनिर्मिती करू शकत नाही. शिवसेना-भाजप युतीच्या विकासाचे मॉडेल राज्यातील जनतेने ९५-९९ मध्ये अनुभवले असून तेच मॉडेल नवीन वेष्टनात गुंडाळून देणार असतील तर ते जनता स्वीकारणार नाही, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.
नवी मुंबईतील वाढीव एफएसआयच्या प्रश्नावर निर्णय घेण्यात आला आहे, पण त्याबाबत असलेल्या न्यायालयातील याचिकांचा अभ्यास करून एक-दोन दिवसांत अधिसूचना काढण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. केंद्रात उणीदुणी काढत बसण्यापेक्षा वीज संकटावर तोडगा काढण्याची गरज उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यक्त केली़