दर रविवारी आणि सुटीच्या दिवशीही मेगा ब्लॉकनामक ताप सहन करणाऱ्या प्रवाशांच्या मागचा तांत्रिक बिघाडांचा ससेमिरा नव्या वर्षांतही संपला नसून शुक्रवारी दोन्ही मार्गावरील प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. पश्चिम रेल्वेवर पालघर-बोईसर यांदरम्यान रेल्वे रूळाला तडा गेल्याने या मार्गावरील वाहतुकीचा बोजवारा उडाला होता. तर मध्य रेल्वेवर सकाळी ओव्हरहेड वायरमधील बिघाड आणि दुपारच्या वेळी रेल्वेगाडीतील बिघाड यांमुळे वेळापत्रक कोलमडले होते.
मध्य रेल्वेवर पहाटेच्या सुमारास कर्जत-खोपोली यांदरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. या स्थानकांदरम्यान विद्युत पुरवठा खंडित झाल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद होती. त्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांना प्रचंड त्रास झाला. दुपारी एकच्या सुमारास अंबरनाथहून मुंबईकडे येणाऱ्या जलद गाडीत तांत्रिक बिघाड झाल्याने ही गाडी दिवा स्थानकाजवळ बंद पडली. त्यामुळे मध्य रेल्वेच्या अप आणि डाउन मार्गावरील वाहतूक २० ते २५ मिनिटे उशिराने सुरू होती. यामुळे १० सेवा रद्द झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
पश्चिम रेल्वेवरही पालघर आणि बोईसर यांदरम्यान रेल्वे रूळाला तडा गेल्याने या मार्गावर काही काळ वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरही गाडय़ा १० ते १५ मिनिटे उशिराने धावत होत्या.