अंधेरी आणि जोगेश्वरी या स्थानकांदरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे सध्या पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेत घरी जाण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. सिग्नल यंत्रणेतील या बिघाडामुळे पश्चिम रेल्वेच्या अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. याशिवाय, मध्य रेल्वेची वाहतूकही काही वेळापूर्वी विस्कळीत झाली होती. सीएसटी स्थानकाजवळ जलद मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे एक ट्रेन थांबून राहिल्यामुळे अन्य गाड्यांचा खोळंबा झाला होता. मात्र, काही वेळापूर्वीच तांत्रिक बिघाड दुरूस्त झाला असून वाहतूक पूर्ववत झाली आहे.