निवडणुकीच्या तोंडावर राज्यात निर्माण झालेल्या वीज टंचाईच्या संकटाचे खापर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रातील भाजप सरकारवर फोडले. केंद्राच्या ग्रीडमधून महाराष्ट्रास वीज देण्यास जाणूनबुजून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करीत वाढत्या भारनियमनास त्यांनी भाजपला जबाबदार धरले.
काँग्रेसच्या प्रचार शुभारंभानिमित्त सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी केंद्रातील मोदी सरकारला लक्ष्य केले. राज्यात वीज टंचाईची समस्या गंभीर बनू शकते याकडे आपण मोदी यांचे पत्राद्वारे लक्ष वेधले होते. या गंभीर प्रश्नावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची बैठक बोलवावी, अशी मागणीही केली होती. पण पंतप्रधानांकडून कोणतीच पावले उचलली गेली नाहीत. केंद्र सरकारने वेळीच हालचाल न केल्यानेच देशातील काही राज्यांमध्ये वीज टंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. सणासुदीच्या काळात राज्यात विजेची गंभीर समस्या निर्माण झाली असताना केंद्रीय ग्रीडमधून अतिरिक्त वीज देण्यास टाळाटाळ केली जात आहे, असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. केंद्रातील भाजप सरकारने राज्याला मदत केली नाही तरी राज्य सरकार आपल्या नागरिकांना अंधाराच्या खाईत लोटणार नाही. पुरेशी वीज उपलब्ध व्हावी म्हणून राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करील, अशी ग्वाहीही चव्हाण यांनी दिली. निवडणूक जवळ आल्याने भाजपने विजेच्या मुद्दय़ावर राजकारण सुरू केल्याचे खापर मुख्यमंत्र्यांनी फोडले.
काँग्रेसची सत्ता असताना केंद्र आणि राज्य यांचे संबंध चांगले राहतील याची खबरदारी घेण्यात आली. विरोधकांची सत्ता असलेल्या राज्यात पंतप्रधानांच्या दौऱ्यात योग्य मानसन्मान राखला गेला. पण भाजप सरकारने यालाच तिलांजली दिली आहे. पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणाऱ्या शासकीय कार्यक्रमांमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बोलू दिले जात नाही. राज्यातील जनता मुख्यमंत्र्यांचा अवमान सहन करणार नाही, असा इशाराही चव्हाण यांनी सोलापूरमध्ये झालेल्या गोंधळाचा आधार घेत दिला.
काँग्रेस सरकारच्या काळातील प्रकल्पांची उद्घाटने मोदी यांच्या हस्ते होत आहेत. मोदी सरकारची १०० दिवसांची कामगिरी अत्यंत सुमार असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली.

वीज समस्या : तेव्हा आणि आता !
आपण सुमारे सहा वर्षे केंद्रात ऊर्जामंत्री होतो व आपल्याला या प्रश्नाची चांगली जाण आहे. जेव्हा एखाद्या राज्यात वीजेची गंभीर समस्या निर्माण झाल्यास अन्य ठिकाणची वीज देऊन तेथील प्रश्न सोडविला जात असे. मग तेव्हा त्या राज्यात सत्तेत कोण आहे याकडे बघितले जात नसे, असे सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले. सध्याचे केंद्र सरकार महाराष्ट्राला मुद्दामहूनच वीज देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोपही केला. मोदी सरकारला गरिबांची कणव नाही, अशी टीकाही त्यांनी केली.