‘रेल्वे प्रवासी-ग्राहक सुविधा पंधरवडा’ अशा गोंडस नावाखाली रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांना कामाला लावण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी मध्य रेल्वेवरील वाहतुकीची परिस्थिती सुधारणे या ‘प्रभू’च्याही हातात नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. या पंधरवडय़ाच्या पहिल्या दिवशी मध्य रेल्वेवरील जलद गाडय़ांची वाहतूक रखडल्यानंतर आता बुधवारी, दुसऱ्या दिवशीही मध्य आणि हार्बर या दोन्ही मार्गावर गाडय़ांची रखडवणूक सुरूच होती. मध्य रेल्वेवर कल्याण स्थानकाजवळ एका लोकल गाडीच्या डब्यातून धूर यायला लागल्याने ही गाडी थांबवण्यात आली. तर हार्बर मार्गावर सानपाडा व वाशी या स्थानकांदरम्यान रूळाला तडा गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.
आसनगावहून ठाण्याला येणारी गाडी शहाड आणि कल्याण या स्थानकांदरम्यान असताना बुधवारी दुपारी या गाडीच्या पेण्टोग्राफला आग लागली. त्यामुळे डब्यातून धूर येण्यास सुरुवात झाली. ही गाडी जागीच थांबवण्यात येऊन डब्यातील सर्व प्रवाशांना सुखरूप खाली उतरवण्यात आले. त्यानंतर मोटरमनने गाडी हळूहळू कल्याण स्थानकात आणली. गाडी स्थानकात आल्यानंतर ही आग विझवण्यात आली. तर हार्बर मार्गावर सकाळी ११च्या सुमारास सानपाडा आणि वाशी या स्थानकांदरम्यान अप मार्गावर रेल्वेरूळाला तडा गेला. त्यामुळे पनवेलहून मुंबईला येणारी लोकल अडकली.