मध्य रेल्वे मार्गावरील दोन तासापासून विस्कळीत झालेली वाहतूक लवकरच सुरु होण्याचे संकेत मिळत आहेत. दादर-माटुंगा दरम्यान रेल्वे रुळाला गेलेले तडे  दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामूळे दोन तास बहुतेक स्थानकावर ताटकळत उभारलेल्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे मध्य रेल्वेच्या मार्गावरील अनेक स्थानकांवर सध्या गर्दी झाली आहे. रेल्वे रुळावर गेलेल्या तडे  दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असले तरी सेवा पूर्ववत होण्यासाठी आणखी काही वेळ लागू शकतो. विस्कळीत झालेली लोकल उशिराने धावण्याची चिन्हे आहेत. कार्यालयातून सुट्टी झाल्यानंतर घरी जाण्याच्या तयारीत असणाऱ्या चाकरमान्यांचा लोकलने शुक्रवारी पुन्हा एकदा खोळंबा केला. दादर-माटुंगा स्थानकादरम्यान रुळाला तडे गेल्याने मध्यरेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. परिणामी रेल्वे रुळाला तडा गेल्यामुळे सीएसटीवरुन- कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या वाहतूकीवर परिणाम झाला असून भायखळ्याहून जलद मार्गावरील  वाहतूक धीम्या मार्गावर वळविण्यात आली आहे. सायंकाळी ६ च्या सुमारास  कोलमडलेली वाहतूक पूर्वपदावर येण्यासाठी आणखी काही वेळ लागण्याची शक्यता आहे. मार्गावरील वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी रेल्वे प्रशासनाने आपले प्रयत्न सरु केले आहेत.