भारतातली पहिली रेल्वे धावणाऱ्या घटनेला शनिवारी १६३ वर्षे पूर्ण झाली असली तरी मध्य रेल्वेवरील गोंधळाचे चक्र मात्र कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. कल्याण-कर्जत आणि कल्याण-कसारा या दोन्ही मार्गांवर सकाळी तांत्रिक बिघाडाल् झयाने मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. यात दिवसभरात २० लोकल रद्द करण्यात आल्या असून सुमारे ५० हून अधिक लोकल विस्कळीत झाल्याने, रेल्वेच्या वाढदिवशीही प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. छत्रपती शिवाजी टर्मिनसहून हावडा जंक्शनला जाणाऱ्या गीतांजली एक्स्प्रेसच्या इंजिनात आसनगांवदरम्यान बिघाड झाला. त्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाडय़ांना याचा फटका बसला. यात लोकल सेवाही विस्कळीत झाल्याने अप मार्गावरील वाहतूक तब्बल २० ते २५ मिनिंटे उशिराने धावत होती. सकाळी ७.४५ च्या सुमारास हा गोंधळ झाल्याने नोकदारवर्गाला याचा फटका बसला. हा गोंधळ दुरुस्त होत नाही तोच कल्याण-कर्जत मार्गादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. हे दोन्ही गोंधळ सकाळच्या वेळेत झाल्याने रेल्वे स्थानकांवर तसेच रेल्वे गाडीच्या डब्यात गर्दी उसळली होती.