मध्य रेल्वेसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी मानल्या गेलेल्या डीसी-एसी परिवर्तनाचा मुहूर्त पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आला आहे. मध्य रेल्वेने डीसी-एसी परिवर्तन करण्यासाठी २३-२४ मेच्या रात्रीचा मुहूर्त निवडला होता. त्यादृष्टीने मध्य रेल्वेने जोरदार तयारीही सुरू केली होती. मात्र रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी परिवर्तनाच्या पाहणीसाठी चार दिवसांचा कालावधी मागितल्याने मध्य रेल्वेने आता हा मुहूर्त पुढे ढकलत २६ मे रोजी परिवर्तन होईल, असे स्पष्ट केले आहे.
डीसी-एसी परिवर्तनाचा प्रकल्प मध्य रेल्वेवर गेली दोन वर्षे प्रलंबित आहे. मुख्य मार्गावरील धीम्या मार्गावर कल्याणपासून मुंब्रा स्थानकापर्यंत तर जलद मार्गावर ठाणे स्थानकापर्यंतचा विद्युतप्रवाह एसी करण्यात आला आहे. तर आता त्यापुढे मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसपर्यंतचे कामही पूर्ण झाले आहे. या कामाची चाचणीही घेण्यात आली होती. त्यानंतर कागदी घोडय़ांच्या जंजाळात हा प्रकल्प अडकला होता.
अखेर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद यांनी २३ व २४ मेच्या मध्यरात्री डीसी-एसी परिवर्तन होणार असल्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मध्य रेल्वेने विशेष ब्लॉक घेण्याच्या दृष्टीनेही तयारी सुरू केली. मात्र आता रेल्वे सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी यांनी या मार्गाच्या पाहणीसाठी कालावधी वाढवून मागितला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने या मार्गाची पाहणी करायला कमी वेळ मिळाल्याचा दावा बक्षी यांनी केला आहे.
रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या सूचनेनुसार आम्ही डीसी-एसी परिवर्तनाचे काम चार दिवस पुढे ढकलत आहोत. हे काम पाऊस सुरू होण्याआधीच आम्हाला पूर्ण करायचे आहे. त्यामुळे आता २६ मे अथवा ३० मे रोजी हे काम पूर्ण करण्यात येईल, असे महाव्यवस्थापक ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद यांनी सांगितले.