आसनगाव आणि वाशिंद या स्थानकांदरम्यान एका मालगाडीत तांत्रिक बिघाड झाल्याने मंगळवारी दुपारी कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली. या बिघाडामुळे तीन सेवा रद्द करण्यात आल्या, तसेच दुपारी उपनगरीय सेवा काही काळासाठी उशिराने धावत होती.
वाशिंदहून आसनगावकडे जाणारी मालगाडी दुपारी आसनगावजवळ बंद पडली. या मालगाडीचे इंजिन बिघडल्याने ही गाडी जागीच उभी राहिली. या बिघाडामुळे कसाऱ्याकडे जाणाऱ्या सेवा वाशिंद स्थानकात रद्द करून पुन्हा मुंबईकडे वळवण्यात आल्या, तर कसाऱ्याकडे जाणाऱ्या काही सेवा रद्द करण्यात आल्या.
या बिघाडाबाबत मध्य रेल्वेच्या उद्घोषणा यंत्रावरून प्रवाशांना सूचना देण्यात येत होत्या. मात्र प्रवाशांचे हाल कमी झाले नाहीत. मध्य रेल्वेमार्गावरील अप दिशेकडे येणाऱ्या काही गाडय़ा उशिराने धावत असल्याने किंवा रद्द झाल्याने दुपारच्या वेळी प्रवाशांची गर्दी झाली होती. मात्र दोन तासांनंतर हा बिघाड दुरुस्त झाल्यावर वाहतूक पूर्ववत झाली.