आठवडय़ातले मेगाब्लॉक वगळता जवळपास सहाही दिवस कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ‘बिघडलेल्या’ मध्य रेल्वेवर बुधवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन वेगवेगळे बिघाड झाले. बुधवार पहाटेपासूनच सुरू झालेल्या बिघाडांच्या या कहाणीमुळे सकाळी ऑफिसला निघालेल्या लाखो लोकांपुढे गर्दीचा डोंगर आणि दिरंगाईचा प्रश्न उभा राहिला. कळवा येथील कारखान्यात विद्युत पुरवठय़ात बिघाड आणि डोंबिवली येथे रुळाला तडा गेल्याने विस्कळीत झालेली मध्य रेल्वेची वाहतूक दुपारी जेमतेम पूर्ववत झाली होती. मात्र या दरम्यान तब्बल २२ सेवा रद्द करण्यात आल्या.
बुधवारी सकाळी कळवा कारखान्यात रेल्वेमार्गावरील ओव्हरहेड वायरला विद्युत पुरवठा होत नव्हता. या विद्युत पुरवठय़ात अडथळा येत असल्याने मध्य रेल्वेने ५.२०पासून एक तास विशेष ब्लॉक घेतला होता. या दरम्यान या कारखान्यातून एकही लोकल गाडी बाहेर पडू शकली नाही. त्यामुळे तब्बल दीड तास कळवा कारखान्यातून ठाण्याला येणाऱ्या ठाणे लोकल रद्द झाल्या. परिणामी तब्बल १८ सेवा रद्द करण्यात आल्या. तसेच इतर सेवाही अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत होत्या. दरम्यान, सकाळी ८.१३च्या सुमारास डोंबिवली स्थानकाजवळ अप जलद मार्गावर रेल्वेरुळाला तडा गेल्याने वाहतूक खंडित झाली. या बिघाडामुळे अंबरनाथहून मुंबईला जाणारी जलद लोकल अडकून पडली. मात्र या लोकलमागच्या सर्व जलद गाडय़ा कल्याण ते दिवा या स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर वळवण्यात आल्या. परिणामी धिम्या मार्गावरील वाहतुकीलाही याचा फटका बसला. या बिघाडादरम्यान चार सेवा रद्द करण्यात आल्या. अखेर ८.४५च्या सुमारास वाहतूक पूर्ववत झाली.हे दोन्ही बिघाड सकाळी ऐन गर्दीच्या वेळी झाल्याने आणि या दरम्यान तब्बल २२ सेवा रद्द झाल्याने चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले. कल्याणपासून घाटकोपर-कुर्ला या स्थानकांपर्यंत प्रत्येक स्थानकावर प्रचंड गर्दी जमली होती. कर्जत-कसारा मार्गावरून भरून येणाऱ्या गाडय़ांमध्ये डोंबिवली किंवा ठाणे स्थानकात चढणे प्रवाशांना अशक्य होत होते.