ठाणे रेल्वे यार्डाचे आधुनिकीकरण, रेल्वे क्रॉसिंगचे नूतनीकरण आणि कल्याण ते ठाणे दरम्यानच्या पाचव्या सहाव्या मार्गाचे विद्युतीकरण यातील बदलांसाठी शनिवारच्या रात्रीपासून सुरू झालेल्या १६ तासांच्या ‘महा मेगाब्लॉक’मुळे वर्षांचा शेवटचा रविवार मुंबईकरांसाठी प्रचंड मनस्तापाचा ठरला. या दिवशी रेल्वे धावल्या त्या अगदी ट्रामगाडी चालल्यासारख्या. परिणामी संपूर्ण मुंबईतील मध्य रेल्वेच्या फलाटांवर मोठय़ा प्रमाणात गर्दी, चेंगराचेंगरी, ढकलाढकली, रडारड आणि चुकामूक हेच चित्र रविवारी दिसले. मध्य रेल्वेवरील प्रवासाचा त्रास नको म्हणत पश्चिम रेल्वेने अथवा हार्बर रेल्वेने प्रवास करू पाहणाऱ्या प्रवाशांना मेगा ब्लॉकचा फटका सहन करावा लागला, तर प्रवासासाठी रस्त्याचा पर्याय निवडणाऱ्यांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले.
मध्य रेल्वेच्या धीम्या तसेच जलद मार्गावर शनिवारी रात्री ९.१५ वाजल्यापासून सुरू झालेल्या मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. शनिवारी रात्री १०.३० नंतर धीम्या मार्गावरील एका मागोमाग एक अशा अनेक गाडय़ांची रांग लागली होती. गाडय़ा नेमक्या किती वेळ उभ्या राहणार याबाबत कोणतीही सूचना प्रवाशांना देण्यात येत नव्हती. छत्रपती शिवाजी टर्मिनस ते थेट कर्जत आणि कसारापर्यंत या मेगा ब्लॉकचे परिणाम जाणवत होते. रविवार सकाळपासून मध्य रेल्वेच्या ठाणे, कल्याण, घाटकोपर, कुर्ला, दादरसह सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना गाडी पकडणे कठीण होत होते. कुर्ला येथे हार्बर मार्गावरील मेगा ब्लॉकमुळे छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून येणाऱ्या गाडय़ा मेन लाइनवरून सोडण्यात येत असल्यामुळे प्रवाशांची धावपळ होत होती. घाटकोपर ते विद्याविहार, भांडुप ते नाहूर आणि नाहूर ते मुलुंड असा प्रवास अनेकांनी रेल्वे मार्गातून भर उन्हात केला. ठाणे ते सीएसटी प्रवासाला तब्बल साडेतीन तास लागले. हार्बरच्या पश्चिम रेल्वेच्या मार्गातील माहीम जंक्शन आणि अंधेरी दरम्यान असलेल्या मेगा ब्लॉकमुळे अंधेरी लोकल रविवारी बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना बोरिवली आणि विरार गाडय़ांनी प्रवास करावा लागत होता. या प्रवासादरम्यान प्रवाशांध्ये शाब्दिक चकमकी उडत होत्या.

लोकलगर्दीचा एक बळी
घाटकोपर आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान दुपारी पावणेतीनच्या सुमारास अक्षय तायडे हा मुलगा लोकलमधून पडून मरण पावला. तर रमाकांत यादव (३०) हा तरुण कुर्ला आणि शीव दरम्यान लोकलमधून पडला. त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले आहे. अक्षय तायडे हा पवई येथे राहणारा आहे.