वक्तशीरपणाच्या बाबतीत दर दिवशी मार खाणाऱ्या मध्य रेल्वेवर बुधवारचा दिवसही फार वेगळा नव्हता. बुधवारी सकाळी ठाणे स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला, तर दुपारी उशिरा सिंहगड एक्स्प्रेसच्या इंजिनात दिवा स्थानकाजवळ बिघाड झाला. दरम्यान, कल्याण स्थानकात एका कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देशव्यापी संपाच्या निमित्ताने आंदोलन केले आणि त्याचा फटकाही वाहतुकीला बसला. परिणामी मध्य रेल्वेची वाहतूक दिवसभर रडतखडतच सुरू होती.
ठाणे स्थानकाजवळ सकाळी साडेनऊच्या सुमारास सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने अप तसेच डाऊन मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. त्यातच दुपारी कल्याणजवळ एका कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देशव्यापी संपाचा भाग म्हणून रेल्वेमार्गावर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनाच्या प्रयत्नामुळे काही काळ उपनगरीय गाडय़ांचा खोळंबा झाला.
दरम्यान, ठाण्याहून दुपारी तीनच्या सुमारास पुण्याकडे निघालेल्या सिंहगड एक्स्प्रेसचे इंजिन दिवा स्थानकाजवळ बिघडले. दुपारी ३.२५च्या सुमारास झालेला हा बिघाड लवकर दुरुस्त न झाल्याने कल्याणहून नवे इंजिन मागवण्यात आले. हा प्रकार तब्बल तासभर चालू होता. अखेर संध्याकाळी ४.३५च्या सुमारास कल्याणहून दुसरे इंजिन येऊन ही गाडी पुढे नेण्यात आली.
मात्र या गाडीमागे दोन जलद गाडय़ा खोळंबल्या, तर उर्वरित जलद गाडय़ा ठाण्यापासून डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात आल्या होत्या. या बिघाडाचा परिणाम संध्याकाळी उशिरापर्यंत जाणवत होता.