उपनगरीय रेल्वे गाडय़ांतून पडून अपघात होण्याचा आलेख उंचावत असल्याने त्यावर तोडगा म्हणून स्वयंचलित दरवाजे बसविण्यासाठी मंजुरी देण्याचे आश्वासन मंगळवारी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी खासदारांना दिले. मात्र चोवीस तासही उलटले नसताना स्वयंचलित दरवाजाचा प्रयोग पश्चिम रेल्वेवर अयशस्वी झाल्याने मध्य रेल्वेवर याचा काहीच उपयोग होणार नसल्याचे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे. त्यामुळे स्वयंचलित दरवाजाबाबत तिढा निर्माण झाला आहे.
गेल्या शुक्रवारी डोंबिवलीतील भावेश नकाते या २२ वर्षीय तरुणाच्या अपघाती मृत्यूबाबत गेल्या काही दिवसांपासून विविध समाजमाध्यमांतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. अनेक प्रवाशांनी रेल्वे स्थानकांवर निषेध करून संताप व्यक्त केला. या घटनेची गांभीर्याने दखल घेत मंगळवारी भाजप-शिवसेना खासदारांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेतली. या भेटीत उपनगरीय रेल्वेच्या गाडय़ांना स्वयंचलित दरवाजे बसवण्याच्या प्रायोगिक प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करण्याची सूचना रेल्वेमंत्र्यांनी केली. मात्र याबाबत मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला विचारले असता, स्वयंचलित दरवाजाचा प्रयोग पश्चिम रेल्वेवर पूर्णपणे फसला आहे. त्यामुळे तोच प्रयोग मध्य रेल्वेवर करून काहीही उपयोग होणार नाही, असे त्यांनी सांगितले आहे.

खर्चाची अडचण?
पश्चिम रेल्वेवर सुरू करण्यात आलेल्या पहिल्या स्वयंचलित दरवाजासाठी प्रत्येक डब्यांसाठी सुमारे सहा लाख रुपयांचा खर्च आला. त्यातून १२ डब्यांच्या एका लोकलसाठी येणारा खर्च साडेचार कोटी रुपये इतका अपेक्षित होता. तर मध्य रेल्वेवरील १२३ आणि पश्चिम रेल्वेवरील ७२ लोकल गाडय़ांसाठी हाच खर्च १ हजार कोटी रुपयांवर जाणार असल्याचे सांगण्यात येते होते. मात्र हा निधी उभारायचा कसा, असा प्रश्न अधिकाऱ्यांसमोर निर्माण झाला होता. अशातच पश्चिम रेल्वेवर स्वयंचलित दरवाजाचा प्रयोग अयशस्वी झाल्याने मध्य रेल्वेवर नवा प्रयोग करणे योग्य ठरणार नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.