मध्य रेल्वेमार्गावर अडकून पडलेले सिंहगड एक्स्प्रेसचे इंजिन ट्रॅकवरून हटविण्यात यश आले आहे. दुसरे इंजिन लावून सिंहगड एक्स्प्रेस मुंबईकडे रवाना करण्यात आली आहे. मात्र, मध्य रेल्वेची वाहतूक अद्यापही विस्कळीतच असून प्रवाशांचे हाल होत आहेत. आज सकाळी सिंहगड एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा बोजवारा उडाला. रेल्वेमार्गावरील पारसिक बोगद्याजवळ इंजिनात बिघाड झाल्याने सिंहगड एक्स्प्रेस बोगद्याजवळ अडकून पडली होती. त्यामुळे मध्य रेल्वेच्या मुंबईकडे येणाऱ्या जलद मार्गावरील वाहतुकीला मोठा फटका बसला होता. या बिघाडामुळे जलद मार्गावर एकामागोमाग सहा ट्रेन्स अडकून पडल्या होत्या. तसेच दुरांतो, मनमाड-सीएसटी यांसारख्या एक्स्प्रेस गाड्यांचाही खोळंबा झाला होता. त्यामुळे जलद मार्गावरील वाहतूक दिवा स्थानकापासून धीम्या मार्गावर वळविण्यात आली आहे. मात्र, या सगळ्या गोंधळात मध्य रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले होते. त्यामुळे या मार्गावरील ट्रेन्स २०-२५ मिनिटे उशीराने धावत आहेत. सकाळच्या ऐन गर्दीच्या वेळेत झालेल्या या गोंधळामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले.