गणेशोत्सवादरम्यान कोल्हापूरमार्गे कोकणातल्या आपापल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आता मध्य रेल्वेने पुणे-कोल्हापूर-पुणे या मार्गावर अनारक्षित गाडय़ा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. १४ ते ३० सप्टेंबर या कालावधीत शुक्रवार वगळता आठवडय़ातील सर्व दिवस ही गाडी धावणार आहे. या २८ विशेष गाडय़ा कोकणात जाणाऱ्या गर्दीचा विचार करून सोडण्यात येणार आहेत.
मुंबईतून थेट कोकणात जाण्यासाठी मध्य रेल्वेने याआधीच विशेष गाडय़ांची घोषणा केली असून या गाडय़ांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. त्यामुळे मुंबईतील चाकरमान्यांची भिस्त खासगी बसगाडय़ांवर आहे. मात्र या बसगाडय़ा अवाच्या सवा भाडे आकारत असल्याने चाकरमान्यांपुढे प्रश्न होता. आता मध्य रेल्वेने या प्रश्नावर काही अंशी तोडगा काढला आहे. मुंबई तसेच पुण्यातील लोकांना पुणे-कोल्हापूरमार्गे कोकणात जाण्याचा पर्याय उपलब्ध असणार आहे. त्यासाठी मध्य रेल्वेने २८ विशेष गाडय़ा सोडण्याचे नियोजन केले आहे.१०३०१ पुणे-कोल्हापूर ही गाडी १४ ते ३० सप्टेंबर या कालावधीत शुक्रवार वगळता सर्व दिवस पुण्याहून पहाटे ०५.४५ वाजता सुटेल. ही गाडी त्याच दिवशी दुपारी १.५५ वाजता कोल्हापूरला पोहोचेल. तर ०१३०२ कोल्हापूर-पुणे ही गाडी कोल्हापूरहून दुपारी २.३० वाजता निघून पुण्याला रात्री १०.३० वाजता पोहोचेल. अनारक्षित असलेल्या या गाडीत द्वितीय श्रेणीचे १० डबे आणि शयनयान श्रेणीचे दोन डबे असतील. ही गाडी निरा, लोणंद, सातारा, कराड, किर्लोस्करवाडी, भिलवडी, सांगली, मिरज, हातकणंगले आणि रुकडी या स्थानकांवर थांबेल.