कुर्ला आणि विद्याविहार या स्थानकांदरम्यान, रूळाला तडे गेल्यामुळे बुधवारी सकाळी विस्कळीत झालेली  मध्य रेल्वेची वाहूतक दुपारपर्यंत पूर्ववत झाली. रूळांच्या दुरूस्तीचे काम सुरू असताना गाड्यांच्या अनेक फेऱ्या रद्द झाल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले होते.  सकाळच्या वेळेत कामावर जाण्यासाठी निघालेल्या कर्मचाऱ्यांना मोठ्याप्रमाणावर गैरसोयीला सामोरे जावे लागले होते. आज सकाळी सातच्या सुमारास कुर्ला-विद्याविहार दरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून तातडीने दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, त्यामुळे ठाण्याहून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. मुलुंड-माटुंगा दरम्यानच्या जलद मार्गावरील सर्व गाड्या धीम्या मार्गावर वळविण्यात आल्याने रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले होते. त्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक अतिशय धीम्या गतीने सुरु होती.  गेल्या अनेक दिवसापासून मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत होत असल्याने लाखो प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.