दरदिवशी ४० लाखांहून अधिक प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या मध्य रेल्वेमार्गावर कागदविरहित मोबाइल तिकीट प्रणाली सुरू होण्यासाठी आणखी महिनाभराचा कालावधी लागणार आहे. ही प्रणाली ऑगस्टच्या मध्यापर्यंत चालू होईल, असे मध्य रेल्वे प्रशासनातर्फे याआधी सांगण्यात आले होते. मात्र, मध्य रेल्वेच्या अखत्यारीत असलेल्या गुंतागुंतीच्या रेल्वेमार्गाची नोंद ‘इस्रो’च्या उपग्रहांमार्फत करणे आणि तिकीट काढण्यासाठीची हद्द ठरवणे कठीण जात असल्याने ही प्रणाली मध्य रेल्वेवर लागू होण्यासाठी विलंब होणार आहे.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते या महिन्याच्या सुरुवातीला पश्चिम रेल्वेवर कागदविरहित मोबाइल तिकीट प्रणालीची सुरुवात झाली. त्यासाठी पश्चिम रेल्वेमार्गाच्या दोन्ही बाजूंना पंधरा मीटर ते दोन किलोमीटर एवढय़ा अंतरावर जीपीएस प्रणालीमार्फत सीमारेषा आखण्यात आल्या. या अंतरातच मोबाइलवरून हे कागदविरहित तिकीट काढणे शक्य होणार आहे. या प्रणालीचा गैरवापर होऊन रेल्वेचे नुकसान होऊ नये, यासाठी ‘सेंटर फॉर रेल्वे इन्फर्मेशन सिस्टिम’ (क्रिस) या संस्थेने ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची’ (इस्रो) मदत घेतली होती. ‘इस्रो’ने आपल्या उपग्रहांच्या मदतीने पश्चिम रेल्वेवर दुतर्फा ही सीमारेषा आखून दिली होती. ही सेवा लवकरच मध्य रेल्वेवरही सुरू होईल, असे सांगण्यात आले होते.
मात्र मध्य रेल्वेवर हार्बर मार्ग, ट्रान्स हार्बर मार्ग आदी विविध मार्ग आहेत. या विविध मार्गावरील काही स्थानके एकमेकांपासून दोन किलोमीटरच्या अंतरावर आहेत. त्यामुळे कागदविरहित तिकीट काढण्यासाठी आवश्यक असलेले अंतर जीपीएस प्रणालीद्वारे आखताना अनेक ठिकाणी घोळ होत होता.