घरातून बाहेर पडल्यानंतर चांगला चहा प्यायचा असेल तर हॉटेलमध्ये जाण्याऐवजी टपरीवरचा चहा पिण्याला अनेकजण पसंती देतात. मात्र अनेकदा तिथल्या अस्वच्छतेमुळे आणि टपरीवर गप्पा मारत थांबण्यासाठी असलेल्या मर्यादेमुळे चहाचा हवा तसा आस्वाद घेता येत नाही. मात्र, कांदिवलीमध्ये चहाची अशी टपरी आहे जिथे तुम्हाला चहासोबत आरामात चर्चाही करता येईल आणि आरोग्यवर्धक चहासुध्दा मिळेल.

चहा आरोग्याला चांगला की वाईट याविषयी लोकांच्या मनात विविध समज आहेत. चाय चौपालमध्ये मात्र चहा हा आरोग्यासाठी चांगलाच आहे आणि लोकांनी तो आवडीने प्यावा याच तत्त्वावर विकला जातो. त्यासाठी संशोधन करून चहाच्या प्रत्येक कपामागे दूध, पाणी, साखर आणि चहा पावडरचं किती प्रमाण असावं हे ठरवण्यात आलेलं आहे. त्यामुळे असा चहा आरोग्याला हानीकराक न ठरता आरोग्यदायी ठरतो, असं दुकानाचे मॅनेजर दीपक यांचं म्हणणं आहे. इथल्या चहामध्ये ७० ते ८० टक्के दूध असतं, त्यामुळे चहाची चवही वेगळी लागते. मुंबईबाहेरून मागवल्या जाणा-या खास चहाच्या पावडरमुळेही चहाची प्रत आणखीनच उंचावते. दहा आणि पंधरा रूपये अशा चहाच्या किमती आहेत.

रजवाडी, राजस्थानी, आल्याचा, मसाला आणि इलायची असे दुधाच्या चहाचे पाच प्रकार येथे मिळतात. त्याशिवाय ब्लॅक, लेमन, ग्रीन, जिंजर लेमन हे बिगर दुधाच्या चहाचे चार प्रकारही आहेत. राजस्थानी चहामध्ये पुदीनाची (िमट) पानं टाकली जातात. तर मसाला चहासाठी लागणारा खास मसाला बाहेरून न विकत घेता ते स्वत: तयार करतात. बिगर दुधाच्या लेमन आणि जिंजर लेमन चहामध्ये येथे मध टाकण्यात येते. त्यामुळे चहाला एक वेगळीच चव येते. परंतु मधाचे हे थेंब संपूर्ण चहा तयार झाल्यानंतर वरून टाकले जातात. हल्ली अनेकजण कुठल्याही पदार्थातील साखरेच्या प्रमाणाबाबत खूपच सतर्क दिसतात. त्यामुळे इथेही तुम्हाला बिगर साखरेचा चहा मिळतो किंवा विनंती केल्यास साखर वेगळीसुध्दा दिली जाते.

काही लोकांना चहा नुसताच प्यायला आवडत नाही. पण काहीतरी स्नॅक्स असेल तर तो मात्र चहासोबत खायला आवडतो. त्यामुळे लोकांना चहासोबत खायला आवडतील असे मोजकेच पदार्थ येथे ठेवण्यात आले आहेत. बन मस्का, खारी आणि टोस्ट हे तीन प्रकार येथे आवर्जुन मिळतात. बटर लावलेला बन पंधरा रूपये आणि चार खारी किंवा टोस्टची प्लेट वीस रूपये इतक्या माफक किमतीत ते उपलब्ध आहे.

चाय चौपालमधील किचन हे ओपन किचन आहे. म्हणजे तुमचा चहा कसा तयार होतो हे तुम्हीसुध्दा पाहू शकता. एवढंच नाही तर त्यांच्या किचनमध्ये कुणालाही प्रवेश करण्याचीही मुभा आहे. सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत चाय चौपाल खुले असते. साधारणपणे१० ते१५ लोकं आरामात बसतील एवढी बसण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. त्यामुळे मॉìनग वॉकनंतर थकलेली मंडळीही येथे विसावलेली दिसतात. त्यानंतर दिवसभर ज्यांना महागड्या कॉफी शॉपमध्ये बसणे परवड किंवा आवडत नाही आणि विशेष म्हणजे चहाचे घोट घेत चर्चा करायला आवडते अशा दर्दी लोकांची गर्दी तुम्हाला येथे दिसेल.

चाय चौपाल

  •  कुठे – शॉप क्रमांक २० , तळमजला, भूमी एन्क्लेव्ह, महावीर नगर, कांदिवली (पश्चिम) – ४०००६७
  • कधी – सोमवारी ते रविवार – सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत.