महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीवर येणाऱ्या आंबेडकरी जनतेच्या स्वागतासाठी मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. आंबेडकर भक्तांसाठी तात्पुरता निवारा, वैद्यकीय सुविधा, पिण्याचे पाणी, माहिती कक्ष आदी सुविधा चैत्यभूमीवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच पोलीस दलही सज्ज झाले आहे.
दरवर्षी ६ डिसेंबर रोजी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी त्यांना अभिवादन करण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीवर येतात. त्यांच्या सोयीसाठी महापालिकेतर्फे दरवर्षी या सुविधा पुरवल्या जातात. यंदा शिवाजी पार्क मैदानात सुमारे एक लाख चौरस फूट आकाराच्या तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाजी पार्क नियंत्रण कक्षाशेजारी व केळुस्कर मार्ग (दक्षिण) आणि चौपाटी अशा तीन ठिकाणी रुग्णवाहिकेसह आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
शिवाजी पार्कमध्ये १२ फिरती शौचालये, चैत्यभूमीजवळ रांगेत असणाऱ्या अनुयायांसाठी पाच फिरती शौचालये, इंदू मिलच्या पाठीमागे बंदिस्त १५० शौचालये,  २५० तात्पुरत्या स्नानगृहांची व्यवस्थाही केली आहे.  प्रथमोपचार केंद्र, पिण्याच्या पाण्यासाठी २७० नळांची व्यवस्था, रांगेत आणि परिसरातील अनुयायांसाठी पिण्याच्या पाण्याचे १५ टँकर्स, संपूर्ण परिसरात महापालिका कर्मचारी व वाहतूक व्यवस्थेमार्फत स्वच्छता, विद्युत व्यवस्था, अग्निशमन दलातर्फे आवश्यक ती अग्निशमन व्यवस्था, चौपाटीवर सुरक्षा रक्षकांसहित बोटी तैनात करण्यात आल्या आहेत. चैत्यभूमीतील आदरांजली प्रसंगाचे केबल दूरचित्रवाहिनीमार्फत चैत्यभूमी व शिवाजी पार्क येथे आठ बाय बारा आकाराच्या मोठय़ा पडद्यावर थेट प्रक्षेपण, शिवाजी पार्क येथे ४६९ स्टॉल्स, वडाळा-दादर (पूर्व) येथील डॉ. आंबेडकर महाविद्यालयात २००० चौरस मीटर क्षेत्रफळ जागेवर तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था, फिरती शौचालये, स्नानगृहे, पिण्याचे पाणी, वैद्यकीय कक्ष उपलब्ध करण्यात आले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘राजगृह’ या निवासस्थानी नियंत्रण कक्ष, वैद्यकीय सेवा कक्ष, एल विभाग कुर्ला टर्मिनस परिसरात नियंत्रण, आरोग्य सेवा कक्ष, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, तसेच स्काऊट हॉल येथे भिख्खूंच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. आंबेडकरी जनतेच्या सुरक्षिततेसाठी पोलीस आणि महापालिका प्रशासनाकडून सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात येत असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.