भारतीय पर्यटनासाठी तसेच नोकरी-व्यवसायानिमित्त जगभर झेपावत आहेत. या जगप्रवासात विविध खाद्यसंस्कृतींशी त्यांचे नाते जुळले असल्याने खाद्यउद्योगाचा पसारा गेल्या काही वर्षांत कमालीचा विस्तारला आहे. थेट परकीय गुंतवणुकीने या उद्योगाला नजिकच्या भविष्यात मोठाच वाव मिळेल, असे प्रतिपादन राज्याचे आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी मुंबईत गुरुवारी ‘फूम्ड हॉस्पिटॅलिटी वर्ल्ड २०१३’ या उद्योगमेळ्याच्या उद्घाटनप्रसंगी केले.
यावेळी इंडियन एक्स्प्रेसच्या उपाध्यक्षा अनुराधा अगरवाल, समूहाच्या व्यवसाय विभागाचे विपणन संचालक फेलिस इन्व्हर्निझी, हानोवर मिलानो फेअर्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक फेइरा मिलानो आणि मेल लानवर्स-शहा यांचाही सहभाग होता. वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए पटांगणावर गुरुवारी सुरू झालेला हा मेळा १२ जानेवारीपर्यंत चालणार आहे.
या उद्योग मेळाव्यात देशभरातील २०० आणि परदेशातील ५० उद्योग-व्यवसायांचे स्टॉल लागणार आहेत. त्याचप्रमाणे पाच देशांचे खास कक्षही तेथे कार्यरत राहतील.सेलफ्रोस्टचे व्यवस्थापकीय संचालक नीरज सेठ यांनी सांगितले की, या मेळ्यामुळे आमच्या व्यवसायवृद्धीला मोठीच चालना मिळणार आहे. एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशनचे आंतरराष्ट्रीय व्यापारसाह्य़ संचालक मार्कस वॉल्डर आणि बोझेनच्या चेम्बर ऑफ कॉमर्सचे साऊथ टायरोल यांनी सांगितले की, ‘भारताकडे आमचा हा तिसरा औद्योगिक दौरा असून खाद्यउद्योगासंबंधातला पहिलाच दौरा आहे. भारतातील बाजारपेठ गुंतागुंतीची असली तरी इथे व्यवसायवृद्धीसाठी बराच वाव आहे.’ केरळ सरकारच्या ‘एनसीएचसी’ या अन्नप्रक्रिया व संशोधन गटाचे संचालक सूरज एस. नायर यांनी सांगितले की, अशा उपक्रमांमुळे अनेक उद्योगांपर्यंत आम्हाला पोहोचता येत आहे.
वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानावर ‘फूड हॉस्पिटॅलिटी वर्ल्ड ट्रेड शो २०१३’ चे उद्घाटन राज्याचे आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. सोबत ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या उपाध्यक्षा अनुराधा अगरवाल. या वेळी फियेरा मिलानोचे कॉपरेरेट मार्केटिंग डायरेक्टर फेलिस इन्व्हेर्निझ्झी, हॅनोव्हर मिलानो फेअर्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मेल लॅन्व्हर्स-शहा उपस्थित होते. शनिवापर्यंत सुरू राहणाऱ्या या प्रदर्शनामध्ये देशभरातून २०० संस्था तर आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या ५० संस्था सहभागी झाल्या आहेत. (छाया : प्रदीप कोचरेकर)