चंद्रकांत पाटील जळगावचे पालकमंत्री;सहपालकमंत्र्यांचा पायंडा

माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय खेळी केली असून खडसे यांचे निकटवर्तीय असलेले कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याकडचे जळगावचे पालकमंत्रीपद काढून ते महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपविले आहे. त्याचबरोबर काही जिल्ह्यांमध्ये सहपालकमंत्री नेमण्याचा नवीनच पायंडा पाडला असून घटकपक्ष व राज्यमंत्र्यांची सोय लावली आहे.

खडसे यांचे मंत्रीपद गेल्यावर जळगावच्या पालकमंत्रीपदावर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा डोळा होता. खडसे व महाजन यांचे वितुष्ट असल्याने त्यांच्याकडे हे पालकमंत्रीपद जाऊ नये, असा खडसे यांचा प्रयत्न होता. त्यामुळे फुंडकर यांच्याकडे बुलढाण्याबरोबरच जळगावचे पालकमंत्रीपद देण्यात आले होते, मात्र आता पुन्हा ते चंद्रकांत पाटील यांच्या सुपूर्द करून खडसे यांचे जिल्ह्यातील महत्त्व कमी करण्यासाठी सूचक इशारा दिला आहे.

यवतमाळ व वाशिमबाबत आगळावेगळाच निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला आहे. यवतमाळमध्ये मदन येरावार हे पालकमंत्री, तर संजय राठोड सहपालकमंत्री असतील. तर वाशिममध्ये संजय राठोड हे पालकमंत्री, तर येरावार सहपालकमंत्री असतील. सातारा जिल्ह्याचे सहपालकमंत्रीपद सदाशिव खोत यांच्याकडे देण्यात आले आहे.

घटक पक्षांना संधी

त्याचबरोबर सहपालकमंत्री नेमण्याची प्रथा आतापर्यंत नव्हती, पण घटकपक्षांचे मंत्री व काही राज्यमंत्री यांना सहपालकमंत्री नेमण्यात आले आहे. पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांना एखाद्या जिल्ह्याचे स्वतंत्र पालकमंत्रीपद न देता उस्मानाबाद जिल्ह्याचे सहपालकमंत्रीपद दिले आहे. येथे दिवाकर रावते हे पालकमंत्री आहेत. सांगलीचे पालकमंत्रीपद सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे, तर परभणीचे पालकमंत्रीपद गुलाबराव पाटील व नांदेडचे अर्जुन खोतकर यांच्याकडे देण्यात आले आहे.