कुलाबा ते सीप्झ या तिसऱ्या मेट्रो रेल्वेच्या मार्गात या टप्प्यात बदल करणे अशक्य आहे, अशी स्पष्टोक्ती ‘मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळा’च्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी केली. तसेच तिसऱ्या मेट्रोच्या शेवटच्या सीप्झ स्थानकापासून आरे कॉलनीतील कारडेपोची जागा अवघ्या सुमारे ८०० मीटर अंतरावर असल्यानेच या जागेचा विचार झाला असे स्पष्ट करत आता कारडेपोच्या जागेच्या पर्यायांची छाननी करण्यासाठी राज्य सरकारने समिती नेमली असून अहवाल आल्यानंतरच याबाबत काय तो निर्णय होईल, असे भिडे यांनी  सांगितले.
कुलाबा-सीप्झ मेट्रो रेल्वेबाबत ‘मुंबई प्रेस क्लब’च्या चर्चेत त्या बोलत होत्या. संपूर्ण अभ्यासाअंती या भुयारी मेट्रो रेल्वेचा मार्ग ठरवण्यात आला आहे. त्याचे नियोजन झाले आहे. प्रत्येक भागातील लोक ‘आमच्या येथून नको दुसऱ्या जागेतून मेट्रो न्या’ असे म्हणतील. लोकभावना आम्ही समजू शकतो, पण अशारीतीने प्रकल्प होत नाही. आता छोटासा बदलही करायचा म्हटले तर नव्याने आखणी करावी लागेल. त्यामुळे मेट्रोच्या मार्गात आता बदल अशक्य असल्याचे भिडे यांनी नमूद केले. ‘एमयूटीपी’, ‘एमयूआयपी’ यांसारख्या ४ ते ५ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांसाठी मुंबईत १४ ते १९ हजार लोक प्रकल्पबाधित ठरले. त्या तुलनेत २३ हजार कोटी रुपयांच्या मेट्रो प्रकल्पामुळे अवघे २६१४ कुटुंबे बाधित होणार आहेत. राज्य सरकारने त्यांच्या पुनर्वसनासाठी धोरणही जाहीर केले आहे. प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवल्यानंतरच त्यांना जागेवरून हलवले जाईल, असे आश्वासन भिडे यांनी दिले.
गिरगावात दोन मेट्रो स्थानकांसाठी बांधकाम पूर्ण झाल्यानंतर अनुक्रमे ८५० चौरस मीटर व ६९० चौरस मीटर जागाच लागणार आहे. त्यामुळे स्थानकांचे काम झाल्यावर त्याच परिसरात प्रकल्पबाधितांना घरे देणे शक्य होईल, असेही त्या म्हणाल्या.

मेट्रोचा चिखल ठाणे-पालघरमध्ये
मेट्रोच्या खोदकामामुळे रोज जवळपास १८० ट्रक भरून दगड-माती-चिखल निघेल. मुंबईत रोज लाखो वाहने रस्त्यावर असतात. त्या तुलनेत १८० ट्रक काहीच नाही. हा सारा चिखल टाकण्यासाठी ठाणे जिल्हा व पालघर जिल्ह्य़ात जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. शिवाय इतर पर्यायही आहेत, पण ते दुसऱ्या गोष्टींवर अवलंबून असल्याने आताच त्याबाबत भाष्य करणार नाही, असे भिडे यांनी स्पष्ट केले.