फैजाबाद येथून मुंबईला येत असलेल्या साकेत एक्स्प्रेसचे इंजिन आणि दोन डबे आसनगावजवळ रूळांवरून घसरल्याने मुंबईहून नाशिककडे जाणारी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. तर टिटवाळा ते कसारादरम्यानची उपनगरीय वाहतूक बंद पडल्याने लोकलप्रवाशांनाही याचा फटका बसला.
फैजाबाद येथून सुटणारी साकेत एक्स्प्रेसने रात्री आठ वाजता आसनगाव स्थानक सोडल्यानंतर शंभर मीटरच्या अंतरावरचे गाडीचे इंजिन व मागील दोन डबे रुळावरून घसरले. चालकाने तात्काळ ब्रेक लावल्याने मोठी दुर्घटना टळली मात्र, या दुर्घटनेमुळे वाहतूक विस्कळीत झाली. या घटनेनंतर नाशिकला जाणारी पंचवटी एक्स्प्रेस सुमारे दोन तास खोळंबली होती तर मध्य रेल्वेची कसाऱ्याकडे जाणारी लोकलसेवा टिटवाळय़ापर्यंतच चालवण्यात येत होती. गाडीचे घसरलेले डबे वेगळे करून हटवण्याचे काम दोन तास सुरू होते.   रात्री ९.४० वाजता डाऊन मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात रेल्वे प्रशासनास यश आले. त्यानंतर अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गावरील वाहतूक एकाच मार्गावरून चालविण्यात येत होती. मात्र लांब पल्लयाच्या गाडय़ा खोळंबल्या होत्या.
तत्पूर्वी, शुक्रवारी सायंकाळी मुंबईहून दिल्लीकडे जाणाऱ्या ‘ऑगस्ट क्रांती एक्स्प्रेस’च्या इंजिनात दादर स्थानकाजवळ बिघाड झाल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. मुंबई सेंट्रल येथून संध्याकाळी ५.४० वाजता निघणारी ऑगस्ट क्रांती राजधानी एक्स्प्रेस ५.५० च्या सुमारास दादर स्थानकाजवळून जात होती. त्या वेळी या गाडीच्या इंजिनात बिघाड झाला आणि ही गाडी थांबली. डाऊन जलद मार्गावर ही गाडी थांबल्याने या मार्गावरील उपनगरीय गाडय़ा डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या. त्यामुळे उपनगरीय रेल्वेचे वेळापत्रकही कोलमडले. अखेर ही गाडी ४० मिनिटांनी म्हणजे ६.३० वाजता अंधेरीकडे रवाना करण्यात आली. या काळात एकही उपनगरीय सेवा रद्द झाली नसल्याचे पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी नितीन डेव्हिड यांनी सांगितले. मात्र सेवा २०-२५ मिनिटे उशिराने सुरू असल्याचेही ते म्हणाले.