काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री कृपाशंकर सिंह आणि त्यांचे कुटुंबीय यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी तब्बल ३२० कोटी रुपयांच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. हा काळा पैसा पांढरा करण्यासाठी त्यांनी बॉलीवूडमधील काही व्यक्तींना गैरमार्गाने पैसेही दिले होते, असेही या आरोपपत्रात म्हटले आहे.
कृपाशंकर यांच्यासह त्यांची पत्नी मालतीदेवी, मुलगा नरेंद्रमोहन, मुलगी सुनिता आणि जावई विजयकुमार यांचा समावेश आहे.
कृपाशंकर सिंह यांच्या पत्नी मालतीदेवी यांनी २००८मध्ये पहिल्यांदाच मल्टि कमोडिटी एक्स्चेंज (एमसीएक्स)मध्ये पैसे गुंतवले होते आणि त्यात त्यांना ३७ लाख रुपयांचा फटका बसला. त्यानंतर त्यांचा मुलगा नरेंद्र याने त्याच्या आईच्या नावाने यात पैसे गुंतवण्यास सुरुवात केली. मात्र यात पैसे गुंतवण्यापेक्षाही काळा पैसा पांढरा करण्याचा हेतू होता, असे या आरोपपत्रात म्हटले आहे.
त्यानंतर नरेंद्र याने बॉलीवूड अभिनेता सलमान खान याला कोणत्याही हमीशिवाय मोठे कर्ज दिले होते. तसेच वांद्रे येथील एका सोसायटीमध्ये सलमानच्या आईवडिलांचे वास्तव्य असलेल्या दोन सदनिका विकत घेण्यातही मालतीदेवी आणि नरेंद्र यांचा हात होता, असेही या आरोपपत्रात स्पष्ट केले आहे.
त्याचप्रमाणे नरेंद्रने १२ बनावट मुद्रांक तयार केले होते. त्यापैकी दोन त्याने २००९मध्ये दिग्दर्शक अनुराग कश्यप याला ‘उडान’ या चित्रपटाच्या निर्मितीसाठी दिले होते. उच्च न्यायालयाने याबाबत पोलिसांना अधिक तपास करण्याचे आदेश दिले आहेत.