गेल्या दोन दशकांत घोडबंदर रोडच्या दुतर्फा विस्तारलेल्या नव्या ठाण्याच्या वाढीलाही आता मर्यादा येत असून त्यामुळे शहरातील बांधकाम व्यावसायिकांनी नव्या वसाहतींचा शोध सुरू केला आहे. उपवन परिसरात नव्या वसाहतींसाठी फारशी जागा नसली तरी येथे शेकडोंच्या संख्येत असलेल्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासातून हजारो नवी घरे उपलब्ध होणार आहेत. त्यामुळेच गेल्या आठवडय़ातच उपवन तळ्याकाठी भरलेल्या ठाण्यातील सर्वात मोठय़ा कला महोत्सवाला विकासकांनी दिलेले प्रायोजकत्व हा खर्च नसून भावी काळाची गुंतवणूक असल्याचे बोलले जात आहे. उपवन ही या नव्या ठाण्याची तलावपाळी असेल, हेच या कला महोत्सवातून सूचित करण्यात आले आहे.
ठाण्यात घोडबंदर वा अन्य भागांपेक्षा उपवन परिसरात राहणे अधिक सोयीचे ठरेल, हे लोकांच्या मनावर बिंबवण्यात या महोत्सवाचाही वाटा होता. घोडबंदरच्या तुलनेत उपवन परिसर ठाणे रेल्वे स्थानकापासून जवळ म्हणजे सात किलोमीटर अंतरावर असून या मार्गावरील पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या वर्तकनगर, शिवाईनगर, शास्त्रीनगर आदी वसाहती रेल्वे स्थानकापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर आहेत. येथील बहुतेक सर्व इमारती तीन ते चार मजली असून त्या किमान ३० ते ४० वर्षे जुन्या आहेत. पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या या इमारतींच्या जागी आता गगनचुंबी टॉवर होणार आहेत. तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळाल्याने आता वर्तकनगरमधील ६३ म्हाडा इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे गेली चार दशके चाळ संस्कृती नांदणाऱ्या या परिसरात टॉवर्सची मुहूर्तमेढ रोवली जाऊन हजारो कोटी रुपयांची उलाढाल होणार आहे.   

हे तर विकासकांचे सांस्कृतिक उत्तरदायित्व
आम्हाला मुंबईतील कॉर्पोरेट्स प्रतिसाद देणार नाहीत, हे गृहीत धरून आम्ही ठाण्यातील विकासकांना आवाहन केले होते. हिरानंदानी, निर्मल लाइफ स्टाइल, दोस्ती, सिद्धी आदी अनेकांनी भरभरून प्रतिसाद दिल्यानेच हा उत्सव यशस्वी झाला, पण हे सर्व या परिसरातील पुनर्विकासासाठीच होते, असे म्हणता येणार नाही. कारण प्रायोजकांपैकी बहुतेकांचे या भागांत प्रकल्पही नाहीत. सांस्कृतिक उत्तरदायित्वाच्या भावनेतूनच त्यांनी मदत केली.  
– संदीप कर्नावट, आयोजक- उपवन आर्ट फेस्टिव्हल

वर्तकनगर म्हाडा वसाहतीचा पुनर्विकास पर्यावरण खात्याची मंजुरी मिळाली नसल्याने रखडला होता. आता या खात्याकडून ‘ना हरकत’ मिळाल्याने ही वसाहत नव्याने उभी राहण्यातले अडथळे दूर झाले आहेत.
– संदीप माळवी-उपायुक्त, ठाणे महापालिका