सीप्झ ते कुलाबादरम्यान होऊ घातलेल्या ‘मेट्रो-३’ प्रकल्पामुळे आसपासच्या शेकडो इमारती बाधित होण्याची शक्यता निर्माण झाली असून गेली अनेक वर्षे या चाळींच्या आश्रयाला असलेले रहिवासी धास्तावले आहेत. या प्रकल्पामुळे राजकीय पक्षांना नरिमन पॉइंट येथील त्यांच्या कार्यालयांची जागा गमवावी लागणार आहे. त्यामुळे पर्यायी जागेसाठी मोर्चेबांधणी करण्यात ते मश्गुल असल्याने ‘मेट्रो-३’पायी दक्षिण मुंबईतील चाळींना निर्माण झालेल्या धोक्याकडे त्यांचे साफ दुर्लक्ष होत असल्याबद्दलही रहिवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
मुंबईकरांना दळणवळणाचे पर्यायी साधन उपलब्ध करण्याच्या उद्देशाने सीप्झ ते कुलाबादरम्यान भुयारी मेट्रो प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवरील ताण हलका होण्यास मदत होणार आहे. ही मेट्रो रेल्वे मुंबई सेंट्रल, ग्रॅन्ट रोड, गिरगाव, चिराबाजार आदी भरवस्तीतून धावणार आहे. या मार्गात दाटीवाटीने उभ्या असलेल्या बहुसंख्य इमारतींनी शंभरी गाठली असून काही इमारती टेकूच्या आधाराने तग धरून आहेत. तसेच काही इमारतींचा पुनर्विकास झाला असून काही इमारतींच्या पुनर्विकासाला गती मिळाली आहे. परंतु आता ‘मेट्रो-३’ प्रकल्प उभारण्यासाठी ‘एमएमआरडीए’ची धावपळ सुरू झाल्यामुळे मुंबई सेंट्रल, ग्रॅन्ट रोड, गिरगाव, चिराबाजार परिसरातील चाळकरी धास्तावले आहेत. ‘एमएमआरडीए’कडून अद्याप या परिसरातील रहिवाशांना कोणतीच कल्पना देण्यात आलेली नाही.
या प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर आपल्याला सध्याच्या घरात राहता येईल का, आपल्याला तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी घर मिळेल का, पुन्हा मूळ ठिकाणी वास्तव्यासाठी येता येईल का, भूमिगत मेट्रोमुळे आसपासच्या इमारतींना हादरा बसेल का, असे असंख्य प्रश्न या परिसरातील रहिवाशांना भेडसावू लागले आहेत.
नरिमन पॉइंट परिसरातील पक्ष कार्यालये मेट्रो-३ प्रकल्पात जाणार हे समजल्यानंतर काँग्रेस, शिवसेना नेत्यांची धावपळ उडाली आहे. पक्ष कार्यालयासाठी नरिमन पॉइंट परिसरातच पर्यायी जागा मिळविण्यासाठी ते धडपडत आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या इमारतींकडे लक्ष देण्यासाठी या नेत्यांना वेळ नाही. निवडणुकांच्या काळात मतांचा जोगवा मागण्यासाठी नेते प्रत्येक इमारतींमधील मतदारांच्या भेटी-गाठी घेतात, पण सत्तारूढ भाजपसकट कोणत्याच पक्षाचा नेता, लोकप्रतिनिधी अथवा कार्यकर्ता ‘मेट्रो-३’ प्रकल्पाची माहिती देण्यासाठी अद्याप आलेला नाही. त्यामुळे नागरिकांच्या मनात प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

विविध कारणांमुळे दक्षिण मुंबईतून मोठय़ा संख्येने मराठी माणसाने स्थलांतर केले. आता ‘मेट्रो-३’ प्रकल्पामुळे उरला सुरला मराठी टक्का आणखी घसरण्याची चिन्हे आहेत. हा प्रकल्प होणे गरजेचे आहे. पण तो लोकवस्ती टाळून करावा, अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल.
– अरविंद नेरकर, माजी आमदार