म्हाडाचे मोकळे भूखंड निम्म्या दरात मिळवून देण्याचे आश्वासन देत शहरातील नामवंत वास्तुविशारदांना सुमारे ८ कोटी रुपयांचा गंडा घातल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दोघांना अटक केली आहे.
या प्रकरणातील फिर्यादी हे वास्तुविशारद आहेत. एका भामटय़ाने त्यांना मंत्रालयात ओळख असल्याचे सांगून मैत्री केली होती. गोराई, चारकोप, दिंडोशी, वर्सोवा येथे म्हाडाचे काही मोकळे भूखंड असून ते पन्नास टक्के रकमेत मिळवून देण्याचे आश्वासन या भामटय़ाने दिले होते. मात्र या भूखंडावर उभ्या राहण्याऱ्या इमारतीत त्याने भागीदारी मागितली होती. या प्रस्तावाला फिर्यादी यांच्यासह अन्य दोन सहकाऱ्यांनी संमती दिली होती. एप्रिल २००८ ते ऑगस्ट २०१४ या काळात त्यांनी या आरोपीला एकूण ७ कोटी ८७ लाख रुपये दिले होते. परंतु एवढी वर्ष उलटूनही भूखंड त्यांना मिळाला नाही. फिर्यादींनी म्हाडामध्ये चौकशी केली असता जी कागदपत्रे या भामटय़ांनी दिली होती ती बोगस असल्याचे लक्षात आले. या भामटय़ाने फिर्यादींना काही रकमेचा धनादेश दिला होता तोही वटला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादींनी बोरिवली पोलीस ठाण्यात धाव घेतली होती.