महाराष्ट्र सदन आणि इंडिया बुल्स प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने स्वतंत्र आरोपपत्र दाखल करून राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्याविरुद्धचा खटला मजबूत केलेला असतानाच सक्तवसुली महासंचालनालयाने काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी केली आहे. मुंबई एज्युकेशन ट्रस्टमधील (एमईटी) काही कर्मचाऱ्यांना माफीचा साक्षीदार करण्याचे निश्चित केल्यानंतर आता भुजबळांच्या विविध कंपन्यांचे डमी संचालक म्हणून नोंदलेल्या कर्मचाऱ्यांचे जबाबही या प्रकरणात वापरले जाणार आहेत.
छगन भुजबळ तसेच त्यांचे पुतणे समीर भुजबळ हे सध्या आर्थररोड तुरुंगात आहेत. छगन भुजबळ हे प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयात आहेत. या प्रकरणी महासंचालनालयाने आरोपपत्रही दाखल केले आहे. अद्याप दोघांनीही जामिनासाठी अर्ज केलेला नाही. या प्रकरणी विविध पद्धतीने महासंचालनालयाने भुजबळांभोवती पाश आवळले आहेत. ८७० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत महासंचालनालयाने २५० कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. आणखीही काही मालमत्ता जप्त केली जाण्याची शक्यता आहे. या खटल्यात भुजबळांना शिक्षा व्हावी, या दिशेने महासंचालनालयाचे प्रयत्न सुरू असून भुजबळांच्या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या जबाबावरच हा खटला प्रामुख्याने अवलंबून असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

नाममात्र संचालक असलेले एमईटीमधील आजी-माजी कर्मचारी : संजय जोशी – लेखापाल (ओरिजिन इन्फ्रास्ट्रक्चर), तन्वीर शेख – विश्वस्तांचे कार्यकारी सहायक (नीश इन्फ्रास्ट्रक्चर), गीता जोशी – लेखापाल जोशी यांच्या पत्नी (नीश इन्फ्रास्ट्रक्चर), नीमेश बेंद्रे – संपर्क समन्वयक (परवेश कन्स्ट्रक्शन), राजेश धारप – लिपिक (देवीशा इन्फ्रास्ट्रक्चर), नितीन शाहू – विश्वस्तांचे कार्यकारी सहायक (भावेश बिल्डर्स प्रा. लि., व्हच्र्युअल टूर इंडिया, ग्रोथ इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि.), इम्रान शेख – तन्वीर यांची पत्नी (ओरिजिन इन्फ्रास्ट्रक्चर), दीपक शिंदे – परवेश कन्स्ट्रक्शन कंपनीचा लेखापाल (दीपम इन्फ्रास्ट्रक्चर आणि यशोधन इन्फ्रास्ट्रक्चर), सत्यम कासेकर – कौटुंबिक मित्र (परवेश कन्स्ट्रक्शन, देवीशा इन्फ्रास्ट्रक्चर, भावेश बिल्डर्स प्रा. लि., व्हच्र्युअल टूर इंडिया, आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर), सुधीर साळसकर – माजी कर्मचारी (आनंदवन इन्फ्रास्ट्रक्चर आणि यशोधन इन्फ्रास्ट्रक्चर), अमित बिराज – विश्वस्तांचे माजी कार्यकारी सहायक (देवीशा इन्फ्रास्ट्रक्चर), दिलीप नायक – गाडी चालक (ग्रोथ इन्फ्रास्ट्रक्चर आणि योजना इन्फ्रास्ट्रक्चर)