एकेकाळी आपल्या आक्रमक बाण्याने विरोधकांची पळता भुई थोडी करणारे व शिवसेनेचा ‘ढाण्या वाघ’ म्हणून संबोधले जाणारे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ सध्या राष्ट्रवादीतच नाराज असून शिवसेनेत जाण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राष्ट्रवादीत राहून आगामी विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता नसल्याचे ताडून भुजबळांनी प्रथमत भाजपशी संधान साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, रा. स्व. संघानेच विरोध केल्याने भुजबळांनी आपल्या पूर्वाश्रमाकडे धाव घेतली. आध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांनी मध्यस्थी करत भुजबळांसाठी उद्धव ठाकरे यांच्याकडे शब्दही टाकल्याचे सूत्रांकडून समजते. खुद्द भुजबळ यांनी मात्र, याचा इन्कार केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमधील कार्यपद्धतीवर भुजबळ नाराज आहेत. त्यातच विधानसभा निवडणुकीतही पक्षाला दणका बसण्याची चिन्हे असल्याने त्यांची बाहेर पडण्यासाठी घालमेल सुरू आहे. भुजबळ यांनी २३ वर्षांपूर्वी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर ते शरद पवारांबरोबर बाहेर पडले. राष्ट्रवादीनेही त्यांना उपमुख्यमंत्रिपद व महत्त्वाची मंत्रिपदे दिली. मात्र, सध्या पक्षात योग्य तो सन्मान राखला जात नसल्याने भुजबळ नाराज असल्याचे समजते. त्यामुळे त्यांनी प्रथम भाजपची चाचपणी केली. नितीन गडकरी यांच्याशीही चर्चा झाली. परंतु संघ आणि काही नेत्यांनी तीव्र विरोध केल्याने भाजपशी सलगी होऊ शकली नाही.
त्यांना पक्षात घ्यायचे किंवा नाही यावर शिवसेनेने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नसला तरी भुजबळ यांचा पक्षाला मोठा फायदा होईल, असा एक मतप्रवाह काही नेत्यांमध्ये आहे. शिवसेनेने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे केले आहे. मात्र ठाकरे कुटुंबियांना निवडणूक लढवून प्रशासन चालविण्यापेक्षा सत्तेचा ‘रिमोट कंट्रोल’ हाती ठेवणे आवडते. शिवसेनेकडे १९९५ प्रमाणे मातब्बर नेत्यांची फळी नाही. त्यामुळे सत्ता आल्यास मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्रिपदासाठी भुजबळ हे अधिक उपयुक्त ठरू शकतात, असाही मतप्रवाह शिवेसेनेत आहे. निवडणुकीनंतर भाजपचा मुख्यमंत्री आणि शिवसेनेचा उपमुख्यमंत्री असे ठरले तर उद्धव उपमुख्यमंत्री होणार नाहीत. त्यासाठी भुजबळ यांचे नाव विचारात घेतले जाऊ शकते. सध्या शिवसेनेचे भाजपबरोबरचे संबंध ताणले गेले आहेत. त्यामुळे भाजपने ‘एकला चलो रे’ ची भूमिका घेतली, तर एकटय़ाने निवडणूक लढविताना भुजबळ यांच्यासारख्या मातब्बर नेत्याचा शिवसेनेला चांगला उपयोग होऊ शकेल, असे शिवसेना नेत्यांचे म्हणणे असल्याचे समजते.  
बडे नेते संपर्कात : फडणवीस
काँग्रेस व राष्ट्रवादीतील माजी मंत्री व अनेक बडे पदाधिकारी भाजपच्या संपर्कात आहेत, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी नाशिक येथे दिली. मात्र जनतेशी नाळ जोडणाऱ्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
“शिवसेना किंवा भाजपच्या नेत्यांबरोबर माझी बोलणी सुरू आहेत किंवा झाली, हे निखालस खोटे आहे. निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर कोणीतरी जाणीवपूर्वक ही अफवा पसरवत आहे. मला कोणत्याही पक्षाकडून ‘ऑफर’ नाही किंवा मी स्वत:हून त्या पक्षांशी बोलणी करण्याचा व माझ्यातर्फे कोणी बोलण्याचा प्रश्नच नाही. राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याचा विचारही नाही.”
 – छगन भुजबळ, सार्वजनिक बांधकाममंत्री