‘सत्ता गेली की सगळेच ग्रह फिरतात’ असे म्हटले जाते. मात्र, राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्याबाबतीत हे विधान चुकीचे ठरले आहे. सत्तेतून बाहेर फेकले गेल्यानंतर मंत्री म्हणून मिळालेला ‘रामटेक’ हा शासकीय बंगला भुजबळांना सोडावा लागणार असला तरी लवकरच भुजबळ कुटुंबीय मुंबईतील सांताक्रूज येथील नऊ मजल्यांच्या आलिशान इमारतीत वास्तव्याला जाणार  आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांच्या मुंबईतीलच अँटेलिया या आलिशान निवासस्थानाइतक्याच सोयीसुविधांनी समृद्ध असलेली ‘ला पेटीट फ्लुअर’ ही अख्खी इमारत भुजबळ यांचा नवा निवारा असणार आहे. नाशिकमध्ये भव्य असा राजमहाल उभारणाऱ्या भुजबळांनी मुंबईतही तसाच महाल उभा करत एक वेगळीच ‘समता’ साधली आहे.

फोटो गॅलरी : भुजबळांचा महाल – गेली शान, तरी आलिशान! 

सांताक्रूजच्या कॉन्व्हेन्ट अ‍ॅव्हेन्यू मार्गावरील  भुजबळ कुटुंबीयांच्या मालकीची ‘ला पेटीट फ्लुअर’- म्हणजे, एक नाजूक फूल – ही नऊ मजली इमारत म्हणजे आधुनिक काळातील महालच आहे. कुटुंबातील प्रत्येकासाठी अख्खा एकेक मजला, डोळे दिपविणाऱ्या अत्याधुनिक सोयीसुविधांनी सजलेला आहे. येथे सुसज्ज मिनी थिएटर आहे, अत्याधुनिक जिम कम हेल्थ क्लब आहे, स्पा आणि सुसज्ज बार व रूफ टॉपवर स्विमिंग पूलदेखील आहे. स्टिल्ट पार्किंग, पहिल्या मजल्यावर लोकांच्या भेटीगाठीसाठी अत्याधुनिक कार्यालय असून समीर व पंकज भुजबळ तसेच छगन भुजबळ हे ज्या मजल्यावर राहणार आहेत तेथे सजावटीचे काम सुरू असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सांताक्रूज येथील नऊ मजली राजवाडय़ात, ‘समते’चा मंत्र देणाऱ्या जोतिबांचा पुतळा आहे, असेही सांगितले जाते.
सुमारे आठ वर्षांपूर्वी परवेझ कन्स्ट्रक्शन्स या नावाने ही जागा घेण्यात आली. २००९ साली या नऊ मजली आलिशान राजवाडय़ाचे काम सुरू झाले होते. विधानसभा निवडणुकांनंतर सत्ता जाण्याची चाहूल लागल्याने, या महालाच्या कामाचा वेग वाढवण्यात आला. अजूनही काही काम शिल्लक असल्याचे सूत्रांनी सांगितले. चार दिवसांपूर्वी देवगिरी या शासकीय बंगल्यामधून येथे काही ट्रकमधून सामानही येऊन पोहोचले. परवेझ कन्स्ट्रक्शन कंपनी ही समीर व पंकज भुजबळ यांच्या मालकीची असून सांताक्रूजमधील या उच्चभ्रू भागात सध्या जागेचा भाव हा सुमारे पन्नास हजार रुपये चौरस फूट असल्याचे सांगण्यात येते. याचा विचार केल्यास या नऊ मजली राजवाडय़ाची किंमत कित्येक कोटी रुपयांमध्ये जात आहे. नाशिक रोडवरील भुजबळांचा राजवाडाही अलीकडच्या काळात उत्सुकतेचा विषय ठरला होता, तर लोणावळा येथेही असाच आलिशान बंगला आहे.

‘ओसी’ मिळाली की नाही?
भुजबळ कुटुंबीयांनी ‘ला पेटीट’मध्ये राहायला जाण्याची तयारी केली असली तरी या इमारतीला मुंबई महापालिकेची ‘ओसी’(भोगवटा प्रमाणपत्र) मिळाली नसल्याचे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता ‘ला पेटीट’ भुजबळ कुटुंबीयांचेच असल्याचे मान्य करून राहायला कधी जाणार हे आत्ताच सांगता येत नाही असे ते म्हणाले. देवगिरी सोडल्यानंतर कोठेतरी व्यवस्था करावीच लागेल असे ते म्हणाले, मात्र ला पेटिटमध्ये राहायला येणार का यावर त्यांनी काहीच भाष्य केले नाही.  छगन भुजबळ यांच्याकडे विचारणा केली असता अजून तरी काही निश्चित केलेले नाही, तसेच या इमरतीला ‘ओसी’ मिळाली की नाही याचीही कल्पना नसल्याचे ते म्हणाले. देवगिरीतील आमचे बरेचसे सामान ला पेटीट तसेच नाशिक येथे पाठविण्यात आल्याचेही भुजबळ यांनी सांगितले.