मुंबईतील ताडदेव परिसरातील एका दाम्पत्याने मूल होत नाही म्हणून दीड वर्षांपूर्वी १.९० लाख रुपये मोजून नांदेड येथील एका संस्थेतून बाळ ‘विकत’ घेतले होते. परंतु गेल्या दीड वर्षांत या बाळाचा आणि या दाम्पत्याचे भावनिक नाते जुळले आहे. त्यामुळे बाळ विकत घेतल्याचा आरोप या दाम्पत्यावर असूनही केवळ त्या बाळाच्या उज्ज्वल भविष्याचा विचार करून त्याला या दाम्पत्याच्या हवाली करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने बुधवारी दिले. परंतु या बाळाचा ताबा केवळ नऊ महिन्यांसाठी या दाम्पत्याला देण्यात आला आहे. या नऊ महिन्यांत बाळाचे संगोपन योग्य प्रकारे केले जात आहे हे सिद्ध झाले तर या बाळाचा  कायमस्वरूपी ताबा या दाम्पत्याला दिला जाईल, असेही न्यायालयाने या वेळेस प्रामुख्याने स्पष्ट केले.

या दाम्पत्यावर हे बाळ विकत घेतल्याचा गुन्हा ताडदेव पोलिसांनी दाखल केल्याने तो रद्द करण्यासाठी आणि बाळाचा ताबा देण्याच्या विनंतीसाठी या दाम्पत्याने न्यायालयात धाव घेतली आहे. बाळ विकत घेतल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी बाळाला ताब्यात घेऊन त्याला ‘आशासदन’ येथे ठेवले आहे. या दाम्पत्याच्या दाव्यानुसार लग्नाला १३ वर्षे उलटूनही मूल न झाल्याने अखेर त्यांनी बाळ दत्तक घेण्याचे ठरवले. त्यांच्या एका मित्राने त्यांना नांदेड येथील संस्थेतून बाळ दत्तक घेण्याचे सुचवले. त्यानुसार त्यांनी ही संस्था गाठली. तेव्हा त्यांच्याकडे १.९० लाख रुपयांची मागणी करण्यात आली.

पैसे दिल्यानंतर त्यांच्याकडे दहा दिवसांचे बाळ सोपवण्यात आले. परंतु या दाम्पत्याने बाळ दत्तक घेण्याच्या प्रक्रियेविनाच १.९० लाख रुपयांमध्ये बाळ विकत घेतल्याची तक्रार डिसेंबर २०१५ मध्ये ताडदेव पोलिसांकडे करण्यात आली.