शासनामार्फत निराधार, मतीमंद, आणि बाल कामगार मुलांच्या पुर्नवसनासाठी चालवल्या जाणाऱ्या बालगृहातील कर्मचारी मात्र उपेक्षितच राहिले आहेत. कारण ऐन दिवाळीच्या सणातही कर्मचाऱ्यांचे पगार झालेले नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
मुंबईत अशा मुलांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी सात बालगृहे आहेत. या बालगृहात आजमितीला सुमारे १५०० मुले आहेत. या मुलांची देखभाल करण्यासाठी आणि बालगहातील इतर कामासाठी सुमारे ३०० कर्मचारी काम करत आहेत. पण गेल्या दीड महिन्यापासून कामगारांना पगारच मिळाला नसल्याचा कामगारांचा आरोप आहे. त्यामुळे कामगारांची ही दिवाळी कोरडीच गेली आहे. या कामगारांना पगार न मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. आमचे पगार रखडत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. सहा महिन्यांपूर्वी तर तीन ते चार महिन्यांचे पगार रखडले होते.
या कर्मचाऱ्यांबाबत सरकार एवढे उदासीन का, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांचा पगार दोन दिवसांत जमा होईल, असे सरकारी उत्तर मुख्य अधिकारी नवनाथ शिंदे यांनी दिले. पण पगार असे अनियमितपणे का होतात, या प्रश्नावर त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया द्यायला नकार दिला.