लोखंडी कुंपण, कर्मचाऱ्यांच्या वावरामुळे मुलांना धास्ती

जिल्हाधिकारी कार्यालयाने बॉम्बे जिमखान्याबरोबर केलेल्या भाडेपट्टय़ाच्या कराराची मुदत संपुष्टात आल्यामुळे बॉम्बे जिमखान्यासमोरील मैदान सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनेनंतर त्या संदर्भातील फलकही पालिकेने मैदानात लावले. मात्र मैदानाभोवती असलेल्या लोखंडी कुंपणामुळे आणि तेथे बॉम्बे जिमखान्याच्या कर्मचाऱ्यांचा असलेला वावर यामुळे मुले या मैदानात आजही पाय ठेवायलाही बिचकत आहेत.

सदर जागा खेळाच्या मैदानासाठी राखीव आहे. तसेच सदर जागा पालिकेच्या ताब्यात आहे. पालिकेने मैदान खुले केले तरी बॉम्बे जिमखान्याचे कर्मचारी त्या जागेवर सतत वावरत असल्यामुळे तेथे कोणाला खेळायला जाता येत नाही, असे स्थानिक तरुणांचे म्हणणे आहे. पालिकेने फलक लावला आहे; मात्र तो नीट दिसत नाही. तिथे खेळायला गेल्यावर सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंतच खेळायची परवानगी असून जागा आमची असल्याचे बॉम्बे जिमखान्याचे कर्मचारी सांगत असून इतर वेळी मैदानात प्रवेश करू देत नाही, अशी माहिती स्थानिक क्रिकेट खेळणारे खेळाडूंनी दिली. बॉम्बे जिमखाना त्याचे भाडेही भरत नाही तरीही जागा बॉम्बे जिमखान्याकडे असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

आझाद मैदानातील २५४४३.३५ चौरस मीटर जागा बॉम्बे जिमखान्याला भाडेपट्टय़ाने देण्यात आली होती. भाडेकरार १७ डिसेंबर २००६ रोजीच संपला. जिमखान्याने ताब्यातील मैदानाला कुंपण न घालण्याच्या अटीचा भंग केल्याप्रकरणी नोटीस बजावल्यावर जिमखान्याने ११ ऑगस्ट २०१६ रोजी हे मैदान सामान्यांसाठी खुले केले. भाडेपट्टय़ाच्या करारात मैदान सर्वसामान्यांसाठी खुले ठेवण्याची अट समाविष्ट करण्यात आली, तरीही बॉम्बे जिमखान्यासमोरील मैदान सद्य:स्थितीतही अर्ध्या जागेवर साखळी घालून बंदिस्त आहे.

सर्वसामान्य मुंबईकरांनी मैदानात प्रवेश केल्यानंतर कर्मचारी तेथून त्यांची हकालपट्टी करतात. ती जागा पालिकेच्या ताब्यात असली तरी बॉम्बे जिमखान्याचे कर्मचारी जागा त्यांची असल्याचे आव आणत तेथे वावरत असल्याची तक्रार स्थानिक मुलांनी केली आहे. मेट्रोच्या कामामुळे आझाद मैदानातील खेळाचे २२ पैकी १६ प्लॉट बाधित झाले आहेत. त्यात धरणे आंदोलनासाठीही आझाद मैदानातील खेळाचे तीन प्लॉट बाधित होणार आहेत. त्यामुळे येथे नेहमी क्रिकेट स्पर्धेची तयारी व सराव करणाऱ्या नवोदित खेळाडूंच्या खेळावर गदा येणार आहे. बॉम्बे जिमखान्यासमोरील जागा पालिकेच्या ताब्यात आहे, मग त्यांनी तेथे आम्हाला सराव करायला द्यावा, असे येथे खेळणाऱ्या मुलांचे म्हणणे आहे.

क्रिकेटच्या सरावासाठी आम्ही कल्याणवरून येथे येतो, मात्र आता ही जागाही मेट्रोच्या कामासाठी जाणार आहे. त्यामुळे आमच्या अकॅडमीने गोरेगाव येथील विनस क्लब येथे सराव करण्यास जाण्यास सांगितले. मात्र इतक्या लांब आम्हाला प्रवास करणे त्रासदायक ठरणार आहे. जर समोरची जागा पालिकेची असेल तर तिथे आम्हाला पालिकेने सराव करण्यास परवानगी द्यावी, असे सनराइज क्रिकेट क्लबचा खेळाडू अरबाज खान यांनी म्हटले.

मुंबईच्या कानाकोपऱ्यातून आम्ही मुले क्रिकेटच्या सरावासाठी येथे येतो. मात्र मेट्रोच्या कामामुळे या जागेवर पाणी सोडावे लागणार आहे.  जर देशात चांगले खेळाडू घडवायचे असतील तर खेळण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे संबंधित यंत्रणेचे कर्तव्य आहे. बॉम्बे जिमखान्यासमोरील जागा मोकळी आहे, मग तिथे आम्हा सामान्य मुलांना खेळण्यास द्यावे. तिथे कोणाचे वर्चस्व असू नये, असे स्थानिक खेळाडू निखिल शेट्टी म्हणाला. याबाबत बॉम्बे जिमखान्याचे डेरिअस उदयवाला यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिक्रिया उपलब्ध होऊ  शकली नाही.

सदर जागा खेळाच्या मैदानासाठी राखीव आहे, तिथे सामान्य मुलांसाठी खेळ खेळण्यास मुभा आहे. बॉम्बे जिमखान्याचे कर्मचारी जरी तिथे देखभाल करीत असले तरी ती जागा सर्वासाठी २४ तास खुली आहे. तिथे सामान्य मुले कोणत्याही वेळेत खेळू शकतात.

– किरण दिघावकर, सहायक आयुक्त, ए वॉर्ड