एका बाजूला अरबी समुद्र आणि एका बाजूला तुंगारेश्वरचे जंगल यांच्या मधोमध वसलेला वसई तालुका म्हणजे विलोभनीय निसर्गसौंदर्याचे लेणे. वसई तालुक्याच्या कुशीत वसलेले चिंचोटी हे एक छोटेसे गाव. मात्र हे गाव प्रसिद्ध आहे, ते तेथील चिंचोटी धबधब्यामुळे. डोंगराच्या कुशीतून वाहत येणारा दुधाळ नजराणा आणि बाजूला पसरलेली हिरवाई यामुळे हा परिसर अतिशय रमणीय वाटतो. पावसाळ्यात ‘चिंब सहल’ साजरी करण्यासाठी पर्यटकांची येथे तुडुंब गर्दी होते.

चिंचोटी धबधब्यापर्यंत पोहोचणारी वाट मात्र सोपी नाही. डोंगराच्या कुशीतील दुग्धझऱ्याकडे जाण्यासाठी तासभराची जंगलवाट तुडवावी लागते. दगडधोंडय़ाची ही वाट असली तरी या वाटेवर निसर्गसंपदेचे विलक्षण दर्शन घडते. जंगलातील अनेक प्राणी, वनस्पती, फुलझाडे, वनौषधी, विविध वैशिष्टय़पूर्ण झाडे आदी निसर्गसौंदर्य नजरेत टिपत पुढे जावे लागते. रंगबेरंगी फुलपाखरे, किलबिल करणारे विविध पक्षी, झाडावरून इकडून तिकडे उडय़ा मारणारी माकडे मधून मधून दर्शन देतात आणि ही वाट सुखकर करतात. डोंगराच्या कुशीतून फुटलेले अनेक निर्झर नयनसुख देतात, तर जंगलातील हिरवाई पाहून मन उल्हसित झाल्याशिवाय राहत नाही.

दाट जंगल, उंच उंच झाडे, दगड-धोंडय़ांची पायवाट, छोटे-मोठे नाले मागे सारत आणि मजल-दरमजल करत तासाभरात आपण चिंचोटीच्या मुख्य धबधब्याजवळ येऊन पोहोचतो. तासभर चालल्यानंतर येणारा थकवा मात्र हा दुधाळ नजराणा पाहून आपसूक पळून जातो. डोंगराच्या कुशीतून येणारे धबधब्याच्या पाण्यामुळे खाली एक डोह तयार झाला आहे. पर्यटक या डोहाच्या पाण्यात डुंबण्याचा आनंद घेतात. अतिशय नितळ आणि थंडगार असलेल्या या पाण्यात डुंबण्याचा आनंद काही औरच आहे. फारशी उंची नसलेल्या या धबधब्याजवळ जाऊन हा अखंड निर्झर देहावर सामावून घेण्याचा प्रयत्न पर्यटक करत असतो.

दैनंदिन आयुष्यापासून आणि दररोजच्या कटकटीपासून दूर असलेल्या या ठिकाणी निवांतपणा लाभतोच, पण हवा असलेला आनंदाचा ठेवा या कोसळणाऱ्या धबधब्यात, रोमारोमांत भिनू पाहणाऱ्या पावसात सापडतो. भोवती हिरवा निसर्ग आणि मध्ये दुग्धनिर्झर डोळ्यात आणि मनात साठवल्याशिवाय पर्यटकाची पावले परतीकडे लागतच नाहीत.

हा डोह आणि धबधब्याचा परिसर पर्यटकांना आनंद देत असला तरी येथे पर्यटनआंनद जरा जपूनच घ्यावा लागतो. पाण्याच्या प्रवाहाचा आणि कुंडाचा अंदाज न आल्याने बरेच अपघात येथे घडतात. डोहाजवळच काही भाग निसरडा असल्याने त्यामुळे पाय घसरून पडण्याची शक्यता असते. त्यामुळे हुल्लडबाजी न करता येथील निसर्गरम्यतेचा आनंद घेतला तर ठीक, नाही तर दुर्घटना ही घडणारच..

चिंचोटी धबधबा कसे जाल?

  • वसईहून कामण रोडला जाण्यासाठी एसटी बस आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कामण फाटा आहे. तिथे उतरून चालत चिंचोटी गावात जावे लागते.
  • नायगाव रेल्वे स्थानकाच्या बाहेर चिंचोटीला जाण्यासाठी रिक्षाची सोय आहे. मात्र या रिक्षा कामण फाटय़ापर्यंतच जातात.
  • दिवा-कोपर-वसई रोड या रेल्वे मार्गावर कामण रोड स्थानक आहे. तिथे उतरूनही चिंचोटीला जाता येते.