मराठी साहित्यिकांची ‘बैल’ या शब्दांत संभावना करून तसेच ‘महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व’ पु. ल. देशपांडे यांना दिलेल्या ‘महाराष्ट भूषण’ पुरस्कारावरून ‘झक मारली आणि पुलंना हा पुरस्कार दिला’ अशी खळबळजक विधाने करणारे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव चिपळूण येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाला देण्यात आले आहे. हे नाव देण्याचे जाहीर झाले तेव्हा कोणतीही प्रतिक्रिया उमटली नसली तरी आता साहित्य वर्तुळात या विषयी दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे. या संदर्भात ज्येष्ठ समिक्षिका प्रा. पुष्पा भावे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी हा निर्णय आक्षेपार्ह असल्याचे ठामपणे ‘लोकसत्ता’ला सांगितले.
पु.ल. देशपांडे यांच्यावरही ठाकरे यांनी ‘मोडका पुल’ अशा जळजळीत शब्दात टीका केली होती. साहित्य संमेलनाला त्यांनी ‘बैलबाजार’ म्हणून हिणवले होते. ठाकरे यांनी वेळोवेळी साहित्यिकांचा अपमान केला असून मराठी साहित्यिक आणि रसिक हा अपमान कसा विसरतात? असा सवालही प्रा. भावे यांनी उपस्थित केला.  चिपळूण संमेलनातील उद्घाटन, समारोप सोहोळा ते संमेलनातील काही परिसंवाद आणि कार्यक्रमातही राजकारणी मंडळींचाच वरचष्मा राहणार आहे. त्यामुळे हे संमेलन साहित्यिकांचे की राजकारण्यांचे असा प्रश्न निर्माण झाला असून त्या पाश्र्वभूमीवर साहित्यकांची ‘बैल’ या शब्दात संभावना करणाऱ्या ठाकरे यांचे नाव संमेलनाच्या व्यासपीठाला देणे कितपत योग्य ठरते, साहित्य संमेलन आयोजनात धनदांडगे आणि राजकारण्यांच्या वाढलेल वर्चस्वाविषयी साहित्यिक कधीतरी ठोस भूमिका घेणार आहेत की नाही, या प्रश्नांवरून पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटणार आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते आणि पुरोगामी साहित्यिक या विषयी आता काय भूमिका घेतात? याकडे साहित्य वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान संमेलन संयोजन समितीचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले की, व्यासपीठाला ठाकरे यांचे नाव देण्याचा निर्णय संयोजन समितीचा आहे.
 चिपळूणचे संमेलन आम्हाला कोणत्याही वादविवादाशिवाय यशस्वी करायचे असून या विषयावर आपल्याला अधिक काहीही भाष्य करायचे नाही. साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रा. डॉ. नागनाथ कोतापल्ले हे वारंवार संपर्क साधूनही प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत.