चर्चगेट स्थानकावर आलेली लोकल अवरोधक भेदून थेट फलाटावर चढल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सोमवारी दिले आहेत. या घटनेला कारणीभूत असलेल्या सर्व मुद्द्यांचा सखोल तपास करण्यात येईल आणि अपघाताला कोण कारणीभूत आहे, याची जबाबदारी निश्चित करण्यात येईल आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे प्रभू यांनी म्हटले आहे. ट्विटवर एका ट्विटच्या माध्यमातून त्यांनी चौकशीसंदर्भात माहिती दिली.


भाईंदरहून चर्चगेटच्या दिशेने येणारी गाडी रविवारी सकाळी ११.२० वाजता चर्चगेट स्थानकात शिरली. नेहमीप्रमाणे या गाडीचा वेग कमी झाला नाही आणि काही क्षणांतच ही गाडी स्थानकावरील फलाट क्रमांक तीनच्या शेवटी असलेल्या अवरोधकांवर आपटली. ती एवढय़ावरच थांबली नाही. गाडी अवरोधक भेदून थेट फलाटावर चढली आणि तब्बल २० ते ३० फूट अंतर पुढे गेली. त्यानंतर चर्चगेट स्थानक इमारतीच्या अगदी दोन फूट अंतरावर गाडी थांबली. या प्रकारामुळे स्थानकावरील अनेक प्रवासी घाबरले. गाडीतील प्रवाशांनाही चांगलाच हादरा बसला. मोठ्या प्रयत्नांनंतर सोमवारी सकाळी ही गाडी फलाटावरून बाजूला करण्यात आली.
गाडीचा वेग कमी न होणे. ती फलाटाच्या शेवटी जाऊन आदळणे, ही गंभीर बाब आहे. प्रथमदर्शनी या अपघातामागे हलगर्जी दिसून येत आहे. मोटरमन तिवारी, गार्ड अजय गोहील आणि लोको निरीक्षक यांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे, असे पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद यांनी रविवारी सांगितले.