चर्चगेट स्थानकात रविवारी लोकल प्लॅटफॉर्मवर चढून झालेल्या अपघाताची चौकशी सुरू झाली असून या चौकशीच्या पहिल्याच दिवशी मोटरमनची कसून चौकशी करण्यात आली. ही गाडी स्थानकात शिरल्यावर थांबवण्यासाठी आपण ब्रेक लावला होता. मात्र अनेकदा प्रयत्न करूनही ब्रेक लागलाच नाही, अशी माहिती या मोटरमनने दिल्याचे समजते. तसेच आता संबंधित गाडीचीही तपासणी करण्यात यावी, अशी मागणी मोटरमनने केली आहे.
चर्चगेट स्थानकात झालेल्या अपघातासाठी मानवी हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा प्रथमदर्शनी निष्कर्ष रेल्वे अधिकाऱ्यांनी काढला होता. ही गाडी बफरला आदळली, त्या वेळी तिचा वेग ४० किमी एवढा असल्याचेही सांगण्यात आले होते. प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर गाडी शिरताना तिचा वेग ३० किमीपेक्षा जास्त असू नये, अशी मर्यादा आखण्यात आली आहे. असे असताना गाडीचा वेग ४० किमी एवढा कसा होता, याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चार अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली आहे. ही समिती ८ जुलैपर्यंत आपला अहवाल सादर करणार आहे.
मंगळवारी या समितीने सदर गाडीचे मोटरमन एल. एस. तिवारी यांची चौकशी केली. या चौकशीत समितीच्या प्रश्नांना उत्तरे देताना तिवारी यांनी आपण गाडीचे ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अनेकदा प्रयत्न करूनही गाडीचे ब्रेक लागले नाहीत, असे सांगितले. तसेच या समितीकडून संबंधित गाडीचीही पूर्ण तपासणी करण्यात यावी, अशी मागणीही मोटरमनकडून करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.