* विनय आपटे यांची ‘सीआयडी’ चौकशीची मागणी
*  मोहन जोशी आज गृहमंत्र्यांना भेटणार
नाटय़ परिषदेच्या निवडणूक ‘नाटय़ा’त दर दिवशी वेगवेगळे ‘अंक’ लिहिले जात असून रविवारी एका वेगळ्या  ‘प्रवेशा’ची नांदी झाली. पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागातर्फे बनावट मतपत्रिका प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ‘नटराज पॅनल’च्या विनय आपटे यांनी केली. गृहमंत्री आर. आर. पाटील याना या प्रकरणी आपटे यांनी विनंती पत्र पाठवले असून या प्रकरणातील खऱ्या सूत्रधारांपर्यंत पोहोचून त्यांना शिक्षा झाली पाहिजे, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला. विशेष म्हणजे आपटे यांच्या मागणीला मोहन जोशी यांनीही पाठिंबा दिला असून या प्रकरणी आपण सोमवारी गृहमंत्री आर. आर. पाटील यांची भेट घेणार असल्याचे जोशी यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
नाटय़ परिषदेच्या निवडणूक प्रक्रियेत सापडलेल्या तब्बल दोन हजार बनावट मतपत्रिका आल्या कुठून, त्या मतपत्रिकांमधील बहुमत ‘उत्स्फूर्त’ पॅनललाच कसे मिळाले आहे, असे अनेक प्रश्न भंडावून टाकणारे आहेत. आता या प्रकरणी केवळ पोलिसांनीच तपास न करता तो तपास गुन्हे अन्वेषण खात्याकडे सोपवावा आणि त्यांनी चौकशी करावी, अशी मागणी आपटे यांनी केली. याबाबत आपण गृहमंत्र्यांना पत्र पाठवले असल्याचेही त्यांनी सांगितले. या नाटकातील ‘घाशिरामा’ला लोकांसमोर आणलेच पाहिजे. तसेच दोषींना सांस्कृतिक विश्वातूनही हद्दपार केले पाहिजे, असेही ते म्हणाले.
आपटे यांनी केलेली ‘सीआयडी चौकशी’ची मागणी रास्त आहे. या चौकशीनेही त्यांचे समाधान झाले नाही, तर त्यांनी दिल्लीला पत्र पाठवून या प्रकरणाची ‘सीबीआय’ चौकशी करण्याची मागणीही करावी, असे आव्हान मोहन जोशी यांनी आपटे यांना दिले. पोलीस तपास चालू असताना पोलिसांकडील माहिती वर्तमानपत्रांत कशी छापून येते, याचीही चौकशी होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.