सिडकोने गावठाण भागात अनधिकृत बांधकामाच्या विरोधात सुरू केलेल्या कारवाईविरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन ‘सिडको हटाव’चा नारा दिला आहे.
सिडकोने घणसोली, गोठिवली या गावांमध्ये अनधिकृत बांधकामावर कारवाई सुरू केली आहे. प्रकल्पग्रस्तांनी ही बांधकामे गरजेपोटी केली असल्याने या बांधकामांवर कारवाई करण्यात येऊ नये, अशी मागणी प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या व्यासपीठावरून सर्वपक्षीय नेत्यांनी केली आहे. यावेळी  राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक, भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे, नवी मुंबई महापालिका विरोधी पक्ष नेते विजय चौगुले आदी नेते उपस्थित होते. सिडकोने जमीन संपादन केल्याने उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नसल्याने गरजेपोटी बांधलेल्या घरांची निर्मिती केल्याचा दावा करीत ही घरे अनधिकृत बांधकाम या प्रकारात मोडत नसल्याचे आमदार नाईक म्हणाले. तर या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन कारवाई रोखण्याची मागणी करणार असल्याचे ते म्हणाले.