नव्याने निर्माण करण्यात आलेल्या पालघर जिल्हय़ाचे मुख्यालय असलेल्या पालघर शहराचा सुनियोजित विकास करण्याची जबाबदारी सिडकोवर सोपविण्यात आली आहे. त्यासाठी पालघर नवनगर विकास प्राधिकरण स्थापन करण्यात येणार आहे. सिडकोच्या माध्यमातून जिल्हा मुख्यालय तसेच सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधण्यात येणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी हा निर्णय घेण्यात आला.

ठाणे जिल्हय़ाचे विभाजन करून नवीन पालघर जिल्हा तयार करण्यात आला. परंतु त्या ठिकाणी विविध शासकीय विभागांसाठी कार्यालये नाहीत. अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या निवासाची व्यवस्था नाही. बहुतांश कार्यालये भाडय़ाच्या इमारतीत सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे शासनाने पालघर शहराचा सुनियोजित विकास करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार मोजे पालघर, कोळगाव, मोरेफुरण, नंडोरे, दोपोली, टेंभाडे व शिरगाव या सात गावांत उपलब्ध असलेल्या ४४०.६७ हेक्टर शासकीय जमिनीवर पालघर जिल्हय़ाचे मुख्यालय व विविध विभागांची जिल्हास्तरीय कार्यालयांची बांधकामे करण्यात येणार आहेत. यामध्ये प्रशासकीय इमारत, जिल्हा परिषद कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालये यांचा समावेश असेल.