पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’अंतर्गत मुंबईमध्ये अनेक भागांत मोबाइल शौचालय उभारण्यात आले. परंतु, यातील अनेक शौचालये स्थानिकांना मनस्ताप ठरत आहेत. दादर पूर्व येथील गौतम नगर भागातील सफाई कामगार वसाहतीजवळ उभारण्यात आलेल्या एका शौचालयाला येथील स्थानिक नागरिक व दुकानदार विरोध करीत आहेत. कारण या शौचालयाजवळच रुग्णालयही आहे.
‘रामकुंवर दफ्तरी रुग्णालया’च्या प्रवेशद्वारालगत परिचारिकांची निवासी घरे आहेत आणि दुसऱ्या बाजूला महानगरपालिकेची शाळा आहे. त्यालगतच महानगरपालिकेचा मोबाइल शौचालय बांधण्याचा अट्टहास आहे. शौचालयाच्या बांधणीसाठी तेथे असलेले सरकारचे दुग्ध केंद्र व विकलांग टेलिफोन केंद्र हलविण्यास सांगितले गेले आहे. त्यामुळे ही केंद्रे चालविणाऱ्यांच्या व्यवसायावरच घाला आला आहे.
शौचालयाचे काम थांबविण्यासाठी तेथील स्थानिक नागरिक, दुकानदार, परिचारिका व ‘रामकुंवर दफ्तरी रुग्णालय’ यांनी महानगरपालिकेशी पत्रव्यवहार केला. मात्र पालिकेने त्यांना साधे उत्तरही दिले नाही. त्यामुळे येथील रहिवासी संतप्त आहेत. ‘आम्ही शहराची साफसफाई करीत असतो. मात्र पालिका आमच्या आरोग्याची पर्वा न करता मनमानी निर्णय घेत आहे,’ असा आरोप सफाई कामगार वसाहतीत राहणाऱ्या काही कर्मचाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर केला. या शौचालयासाठी पालिकेने ‘रामकुंवर दफ्तरी रुग्णालय’ या पुरातन वारसा असलेल्या इमारतीचा काही भागही तोडल्याचा आरोप त्यांनी केला.
शौचालयांमध्ये स्वच्छतेचा अभाव व दरुगधीचे साम्राज्य असते. अशा वेळी याचा त्रास रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिकांनी रुग्णालयातील होणारे त्रास व दादर परिसरात एक शौचालय असतानाही पुन्हा नवीन शौचालयाची गरज काय ही दुसरी बाजू एका रहिवाशाने मांडली.

निवडलेले ठिकाण योग्यच
मोबाइल शौचालय हे महानगरपालिकेच्या अखत्यारीत आहे. नेहमीच मुंबईत शौचालयाच्या त्रासाला तोंड द्यावे लागते. मुख्यत: महिलांना मोठी अडचण सहन करावी लागते. अर्थात त्याकरिता महानगरपालिकेला धारेवर धरले जाते. गौतम नगरमध्ये शौचालयासाठी पालिकेने निवडलेले ठिकाण योग्यच असून त्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही. त्याच्या स्वच्छतेची काळजी घेतली जाईल. स्थानिकांना त्रास झाल्यास त्यावर विचार करता येईल. पण, पालिका करीत असलेल्या विकासाच्या कामामध्ये कोणी अडथळा आणल्यास सहन केले जाणार नाही.
– प. ना. कु ऱ्हाडे, साहाय्यक आयुक्त